
डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा भव्य सत्कार – पनवेलमध्ये अनोखा उपक्रम
पनवेल : प्रतिनिधी
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्था पनवेल, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइज आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे भव्य डॉक्टर सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा एकत्रित गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र शासनाचे माजी म्हाडा अध्यक्ष श्री. बाळासाहेब पाटील यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार मा. श्री. विक्रांतदादा पाटील, पनवेल महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. नितीनजी पाटील व प्रांतपाल रोटरी प्रांत 3131 श्री. नितीन धमाल, परभणी येथील धन्वंतरी सरस्वती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील, नगरसेविका डॉ. दर्शना भोईर तसेच माजी महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होते.


या सोहळ्यात पनवेल व परिसरातील गेली १५ ते ३० वर्षे आरोग्यसेवा देणाऱ्या जनरल प्रॅक्टिशनर्स, औद्योगिक वैद्यकीय अधिकारी, विविध तज्ज्ञ सल्लागार डॉक्टर अशा सर्व क्षेत्रातील एकूण ४७ डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या उपक्रमाचे नेतृत्व रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री पाटील तसेच कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील व ट्रस्टी दादासाहेब श्री पराग बेडसे यांनी केले.
या कार्यक्रमास रोटरीचे माजी प्रांतपाल रो. डॉ. गिरीश गुणे, रो. डॉ. दीपक पुरोहित, रो. डॉ. शैलेश पालेकर आणि रो. डॉ. अनिल परमार यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज, रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.



तसेच या सोहळ्यास वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ डॉक्टर डॉ. सुहास हळदीपुरकर, डॉ. रमेश पटेल, डॉ. ययाती गांधी, डॉ. समिधा गांधी, डॉ. समीर सहस्रबुद्धे, डॉ. सुरेश मोरे, डॉ. प्रमोद गांधी, डॉ. विजय डोंगरे, डॉ. आशा डोंगरे, डॉ. डी. बी. पाटील, डॉ. शोभना पालेकर, डॉ. जनार्दन, डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ. शैलेश गांधी, डॉ. महेश मोहिते असे अनेक मान्यवर डॉक्टर तसेच पॅरामेडिकल स्टाफ, नर्सिंग स्टाफ तसेच मान्यवर बांधकाम व्यावसायिक श्री. सतीश मोरे आणि डॉ. मानसी मोरे शेलके यांचीही उपस्थिती लाभली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, रोटरी क्लब ऑफ सनराईज पनवेल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर यांची संयुक्त फ्युजन सभा देखील पार पडली. रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री पाटील, सचिव ॲड. डॉ. हितेश राजपूत, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे अध्यक्ष रो. इंजि.काशिराम पाटील, सचिव रो. श्री.रुपेश यादव तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरचे अध्यक्ष रो. श्री. भगीरथ गोस्वामी, सचिव रो. डॉ. दीपक खोत आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर मा. श्री. नितीनजी पाटील यांनी लोकनेते माजी खासदार श्री. रामशेठ ठाकूर यांचा नियोजीत अमृत महोत्सवानिमित्त केलेला सत्कार व मानपत्र प्रतिनिधी म्हणून स्वीकारले. त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर समाजाचे आरोग्य रक्षण करणारे खरे शिल्पकार असून त्यांची सेवा अमूल्य असल्याचे सांगितले व अशा उपक्रमांमुळे समाजात डॉक्टरांविषयीचा आदर अधिक दृढ होतो, असे प्रतिपादन केले.
आमदार मा. श्री. विक्रांतदादा पाटील यांनी सांगितले की, “जन्मापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत प्रत्येक व्यक्तीला डॉक्टरांची गरज भासते. देवाच्या नंतर आपण डॉक्टरांनाच स्मरतो. कोणताही रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, ही प्रत्येक डॉक्टरची सामाजिक जबाबदारी आहे.”
अध्यक्षीय समारोपात श्री. बाळासाहेब पाटील यांनी डॉक्टरांच्या समाजसेवेचे कौतुक करून अशा गौरव सोहळ्यांमुळे सेवाभावी वैद्यकीय क्षेत्राला नवी प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.
कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्था पनवेलचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पनवेलमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांचा सन्मान करण्याचा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी १ जुलै रोजी हा सन्मान सोहळा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.”

पीडीजी रो. डॉ. गिरीश गुणे यांनी रोटरी आणि वैद्यकीय व्यवसाय यांच्यातील ‘Service Above Self’ या समान मूल्यावर प्रकाश टाकत, ग्रामीण भागात निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या डॉक्टरांचाही अशाच प्रकारे सर्व रोटरी क्लबांनी सन्मान करावा, असे आवाहन केले.
हा आगळावेगळा डॉक्टर गौरव सोहळा उपस्थित मान्यवर, डॉक्टर, रोटेरियन्स आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या सोहळ्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निर्मिती सावंत आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या ‘विहीणबाई जोरात’ या विनोदी नाटकाचे सादरीकरण झाले. हे नाटक सर्व निमंत्रित आणि मान्यवरांनी मनापासून आनंद घेत पाहिले. आयोजकांनी घेतलेल्या परिश्रमांचे सर्वांनी कौतुक केले तसेच मध्यंतरात स्नॅक्सची व्यवस्था केल्याबद्दलही आयोजकांचे विशेष अभिनंदन केले, ज्यामुळे उपस्थितांना कार्यक्रम आणि नाटक उशिरापर्यंत आनंदाने पाहता आले.




Be First to Comment