
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल परिसरात उभ्या असणाऱ्या ट्रेलरमधून डिझेल चोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांचा तिसरा साथीदार गुन्ह्यातील गाडीसह पसार झाल्याने त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
पनवेल जवळील गोवाकडे जाणाऱ्या मार्गावर शिरढोण गावाच्या हद्दीत साईकृपा हॉटेल समोर उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलरमधून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये किंमतीचे डिझेल चोरल्याची तक्रार रामप्रताप राजभर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीनुसार वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि.विनोद लभडे, पो.हवा.परेश म्हात्रे, अविनाश गंथडे, महेंद्र वायकर, योगेश दिवेकर, विनोद देशमुख आदींचे पथक तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार परेश म्हात्रे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराद्वारा सदर गुन्ह्यातील दोन आरोपी खारघर परिसरातील डोंगर भागात लपले असल्याचे समजले. त्यानुसार या पथकाने आरोपी सुरज खरात (21) व भुपेंद्र सिंग (21) या दोघांना ताब्यात घेतले.
दरम्यान या गुन्ह्यातील तिसरा आरोपी पप्पू कुमार हा चोरीनंतर वापरलेल्या वाहनासह पसार झाला होता. या दोन आरोपींकडून जवळपास 1 लाख 11 हजार 600 रुपये किंमतीचे 1200 लिटर डिझेलचे 30 कॅन हस्तगत करण्यात आले आहेत. तर उर्वरित माल हा फरार झालेल्या आरोपीकडे असल्याने त्याचा शोध पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पो.हवा.अविनाश गंथडे करीत आहेत.


Be First to Comment