Press "Enter" to skip to content

खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत व्यक्त केली नाराजी

आमदार प्रशांत ठाकूर यांची महावितरण कार्यालयात धडक

पनवेल (प्रतिनिधी) कामोठेसह पनवेल परिसरातील विविध भागांमध्ये सातत्याने होत असलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या गंभीर समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी थेट भिंगारी येथील महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंत्यांसोबत सविस्तर चर्चा करून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

पनवेल, कामोठे तसेच आसपासच्या परिसरात नियमितपणे वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थीवर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी निदर्शनास आणून दिले. महावितरणकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली तसेच नागरिकांना वारंवार होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळावा यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा आणि देखभाल कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी इशारा देताना सांगितले की, महावितरणचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्षपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित पावले उचलली नाहीत, तर जनआंदोलन छेडले जाईल तसेच महावितरणचा असाच ढिसाळ कारभार सुरू राहिल्यास संबंधित कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल.

या प्रसंगी भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष व नगरसेवक विकास घरत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, प्रदीप भगत, रवींद्र जोशी तसेच दामोदर चव्हाण व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण प्रशासनावर दबाव वाढला असून आगामी काळात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणती पावले उचलली जातात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.