
कामोठे : प्रतिनिधी
आज पनवेल महानगरपालिकेचे विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभागाचे विलास चव्हाण यांची नगरसेवक विकास घरत ,नगरसेवक रवींद्र जोशी, नगरसेवक प्रदीप भगत, नगरसेविका हेमलता गोवारी, नगरसेविका कुसुम म्हात्रे तसेच समाजसेवक भाऊ भगत यांनी भेट घेऊन कामोठे परिसरातील सिडकोकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
कामोठे परिसरातील अनेक भागांमध्ये दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असून त्याची तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या गंभीर विषयावर पनवेल महानगरपालिकेने सिडकोसोबत समन्वय साधून अधिक प्रभावी नियंत्रण व देखरेख ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी, नमुने चाचणी व संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना राबविण्याची विनंती करण्यात आली.
कामोठेकरांना स्वच्छ, सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही आणि या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.



Be First to Comment