
पनवेलमधील आगीच्या घटनेनंतर शिवसेना ॲक्शन मोडमध्ये ; थेट गाड्यांवर लावला अग्निशमन प्रमुखांचा नंबर
पनवेल : प्रतिनिधी
पनवेलमधील अतिशय दाटीवाटीच्या कापड बाजार परिसरात जैन मंदिरासमोर असलेल्या ‘जलाराम सावित्री’ इमारतीच्या मीटर रूमला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. ही आग वायरच्या माध्यमातून वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, जागरूक शिवसैनिक ॲड. स्वप्निल उपाध्ये यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला. आग लागल्याचे पाहताच त्यांनी तात्काळ पालिकेच्या वेबसाईटवर आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांवर मोठ्या अक्षरात लिहिलेल्या ०२२-२७४६१५०० या क्रमांकावर फोन केला, परंतु हा नंबर अस्तित्वातच नसल्याचे समोर आले.
आपत्कालीन परिस्थितीतील महापालिकेचा हा निष्काळजीपणा अत्यंत दुर्दैवी ठरला असता, पण ॲड. उपाध्ये यांनी तात्काळ शिवसेना नगरसेवक तथा महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्याशी संपर्क साधला. ॲड. सोमण यांनी कोणतीही वेळ न गमावता नवीन पनवेल सिडकोच्या फायर डिपार्टमेंटशी संपर्क करून तेथून पनवेल शहराच्या अग्निशमन दलाशी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधला. यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी कौतुकास्पद व शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
या संपूर्ण गंभीर प्रकारानंतर शिवसेना महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश सोमण यांनी सकाळीच फायर ब्रिगेड स्टेशनला भेट देऊन प्रशासनाला धारेवर धरले. नवीन अधिकृत नंबर दोन दिवसात ऍक्टिव्हेट करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आणि तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अग्निशमन प्रमुखांचा स्वतःचा नंबर थेट गाड्यांवर लावण्याचा इशारा दिला. हे नुसते बोलून न थांबता शिवसेनेच्या वतीने अवघ्या तासाभरात नव्या क्रमांकाचे स्टिकर्स बनवून ते फायर ब्रिगेडच्या गाड्यांवर लावण्यात आले. याप्रसंगी महापौर व आयुक्तांनाही या प्रकरणाची माहिती देऊन आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची विनंती करण्यात आली. नागरिकांच्या माहितीसाठी आता अग्निशमन प्रमुख अधिकाऱ्याचा ०८१०८३ ८०१०१ हा क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रसंगी युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, अर्जुन परदेशी, उपविभागप्रमुख मंदार काणे आणि शाखाप्रमुख गुलाब बागवान उपस्थित होते. शिवसैनिकांच्या या तत्परतेमुळे पनवेलमधील मोठी दुर्घटना टळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




Be First to Comment