
टाटा स्टीलजवळ गॅस लिकेजचा संदेश देऊन मॉक ड्रिलचे आयोजन
मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वयाची चाचणी घेण्यासाठी खालापूर तालुक्यात प्रशिक्षण शिबिर आणि मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशानुसार खालापूर तहसीलदार कार्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सदस्यांना मान्सूनपूर्व तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याच अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी मॉक ड्रिलही घेण्यात आले.
रायगड जिल्हा आपदा मित्र यंत्रणेचे नोडल अधिकारी एम. के. म्हात्रे यांनी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील विविध बाबींवर मार्गदर्शन केले. दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास खालापूर तालुक्यातील टाटा स्टील कंपनी परिसरात गॅस लिकेज झाल्याचा अलर्ट संदेश देण्यात आला. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि जवान आवश्यक संसाधनांसह टाटा स्टील कंपनीच्या गेट क्रमांक एकजवळ दाखल झाले.
आपत्कालीन यंत्रणांची तत्परता, समन्वय आणि प्रतिसाद क्षमतेची चाचणी घेण्यासाठी ही मॉक ड्रिल आयोजित करण्यात आल्याचे नोडल अधिकारी एम. के. म्हात्रे आणि श्रीकांत शिरसाठ यांनी सांगितले. यावेळी नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची काळजी, सुरक्षितता उपाय आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याबाबत माहिती देण्यात आली.
या मॉक ड्रिलमध्ये महसूल विभागाचे अधिकारी राम पवार, खोपोली नगर परिषदेचे फायर ऑफिसर मोहन मोरे व जवान, खालापूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार व पोलीस कर्मचारी, टाटा स्टीलचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, स्वामिनी ॲम्बुलन्स सर्विसच्या रुग्णवाहिका तसेच अन्य संस्थांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदविला.



Be First to Comment