Press "Enter" to skip to content

“व्यसनमुक्त खोपोलीसाठी पानटपरी चालकांची साथ; पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद”

खोपोली शहरातील नागरिक आणि विशेष करून तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकू नये, आरोग्यदायी समाज घडावा आणि अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊ नयेत या सामाजिक जाणीवेतून खोपोली पोलीस स्टेशनने शहरातील पानटपरी चालकांची विशेष बैठक घेतली. यावेळी प्रभारी पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी गुटखा, ई-सिगारेट, व्हेप, हुक्का, फुलचंद पान तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री टाळण्याचे आवाहन केले.

बैठकीत त्यांनी युवक आणि विद्यार्थी वर्गामध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त केली. क्षणिक नफ्यासाठी विकल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे अनेक कुटुंबांवर आरोग्य आणि आर्थिक संकट ओढवत असल्याचे सांगत, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे वाढते प्रमाण ही समाजासाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाने बंदी घातलेल्या पदार्थांची विक्री करताना कोणीही आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची स्पष्ट जाणीव करून देतानाच ही कारवाई केवळ दंडात्मक नसून समाजहितासाठीची पूर्वसूचना असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरातील प्रत्येक व्यावसायिकाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

विशेष म्हणजे, या बैठकीत उपस्थित सर्व पानटपरी धारकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत प्रतिबंधित पदार्थांची विक्री टाळण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका मांडली. “व्यवसायासोबत समाजाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे,” ही भावना व्यक्त करत त्यांनी पोलिसांच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला.

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या जनजागृती मोहिमेमुळे खोपोली शहर व्यसनमुक्त आणि अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.