
नवी मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; ७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली
पनवेल दि.१७(वार्ताहर): राज्याच्या गृह विभागाने पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, अपर पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस उपआयुक्त श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. या फेरबदलात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मोठे बदल झाले असून, अनेक अनुभवी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, तर काहींना पदोन्नती मिळाली आहे.

‘नवी मुंबई’चे पोलीस सह-आयुक्त संजय येनपुरे यांची मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) या महत्त्वपूर्ण पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ‘नवी मुंबई’चेच अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांची पदोन्नतीने पोलीस सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साकोरे यांना शहराच्या गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा दांडगा अनुभव असल्याने त्यांच्यावर सदर मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या ५ उपायुक्तांच्या बदल्या इतर शहरात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांची पोलीस उपायुक्त-बृहन्मुंबई, परिमंडळ-३ चे उपआयुक्त प्रशांत मोहिते यांची उपआयुक्त-छत्रपती संभाजीनगर शहर, उपआयुक्त (मुख्यालय) संजय पाटील यांची उपआयुक्त-पिंपरी चिंचवड, वाहतूक विभागाचे उपआयुक्त तिरुपती काकडे यांची पोलीस अधीक्षक-महामार्ग सुरक्षा (रायगड) आणि डायल-११२ च्या पोलीस उपआयुक्त प्रिती टिपरे यांची पोलिस उपआयुक्त-मिरा-भाईंदर-वसई-विरार येथे बदली करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरातील रिक्त होणाऱ्या पोलिस उपआयुक्त पदांवर प्रकटीकरण-१ चे पोलीस उपआयुक्त विशाल ठाकूर, राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपआयुक्त योगेश चव्हाण, अन्न-औषधी प्रशासन (मुंबई) चे पोलीस अधीक्षक राहुल खाडे आणि पोलीस महासंचालक कार्यालयातील सहाय्यक विशेष पोलीस महानिरीक्षक विजय खरात यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. तर राज्य महामार्ग सुरक्षा (रायगड) चे पोलीस अधिक्षक तानाजी चिखले यांची डायल-११२ नवी मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.




Be First to Comment