
रोहा,दि.११(नंदकुमार मरवडे)
ज्ञान प्रबोधिनी, पुणे आणि केपीआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या ‘छोटे सायंटिस्ट’ प्रकल्पांतर्गत ‘समस्या परिहार’ स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी पुण्याच्या जे.पी. नाईक सेंटर येथे १० दिवसीय विशेष निवासी विज्ञान शिबिराचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. विज्ञानाची ओढ आणि संशोधक वृत्ती जोपासणाऱ्या या शिबिरात महाराष्ट्रातील १८० विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नाविन्याचा शोध घेतला.
या शिबिरामध्ये रायगड (रोहा + माणगाव), हराळी, सोलापूर, कराड, साळुंब्रे, वाई, सातारा, पुणे शहर-निमशहरी आणि हडपसर या ९ केंद्रांमधील निवडक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराचे नियोजन दोन सत्रांत करण्यात आले होते; ज्यामध्ये इयत्ता ८ वी (२९ एप्रिल ते ३ मे) आणि ९ वी (५ मे ते ८ मे) या कालावधीत विज्ञानाचे विविध पैलू उलगडण्यात आले.
रोहा केंद्रातून द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी, द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय विरजोली, श्रमिक विद्यालय चिल्हे, पी. एन. पी. माध्यमिक हायस्कूल तळाघर,श्री. रा. ग. पोटफोडे विद्यालय खांब.आदी शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिबिरा दरम्यान केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला.या उपक्रमात लाकूडकाम कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोबाईल स्टॅन्ड तयार केले, तर ‘आर्डुइनो प्रोग्रामिंग’च्या माध्यमातून कोडिंगचे प्राथमिक धडे गिरवले.
तज्ज्ञ मार्गदर्शन: फिजिओथेरपी, गणितातील रंजक खेळ आणि आकलन कौशल्यांवर आधारित सत्रांनी विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता वाढवली.तर ‘द मार्शियन’ चित्रपटाद्वारे कठीण प्रसंगात विज्ञानाचा कल्पक वापर कसा करावा, याचे प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले.
अरविंद गुप्ता पद्मश्री प्राप्त शास्त्रज्ञ यांनी विज्ञानातील खेळणी आणि प्रयोगांतून ‘टाकाऊतून टिकाऊ’ विज्ञान कसे शिकावे, याचे अद्भूत दर्शन त्यांनी घडवले.

माजी डीन, FTII व चित्रपट दिग्दर्शक
समर नखाते यांनी चित्रपट पाहणे म्हणजे काय?’ या सत्रातून त्यांनी दृकश्राव्य माध्यमांचे तंत्र आणि चित्रपट निर्मितीतील विज्ञान सोप्या भाषेत उलगडून सांगितले.
विज्ञानाचा व्यापक अनुभव देण्यासाठी मेट्रो प्रवासाचा थरार अनुभवत विद्यार्थ्यांनी येथे ऊर्जा, ऑटोमोबाईल आणि तारांगणाचा अभ्यासाबरोबरच भौतिक, रसायन आणि जीवशास्त्रातील प्रयोग विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत स्वतः हाताळले.देशातील सर्वोच्च संशोधन संस्थेत शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. मेंदूविज्ञानातील प्रयोगांनी विद्यार्थ्यांची संशोधकी वृत्ती अधिक प्रगल्भ केली.
शिबिराच्या समारोपाला केपीआयटीचे चेअरमन आणि प्रकल्पाचे मार्गदर्शक रवी पंडित यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विज्ञानाचा प्रचार ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे स्वप्न या शिबिराच्या माध्यमातून पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
शिबिराच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांनी आपल्या ‘टास्क’चे प्रभावी सादरीकरण केले. ‘समस्या परिहार’ या मूळ उद्देशाला अनुसरून विद्यार्थ्यांनी शोधलेली वैज्ञानिक उत्तरे पाहून मार्गदर्शकांनी त्यांचे कौतुक केले. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पथकांचा विशेष गौरव करून शिबिराचा समारोप करण्यात आला.
ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका पुणे विभाग प्रमुख अमर परांजपे आणि प्रकल्प प्रमुख पूर्वा धोकटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत नेटकेपणाने पार पडले.
ग्रामीण भागातील या छोट्या शास्त्रज्ञांच्या डोळ्यांत आता जागतिक विज्ञानाची स्वप्ने तरळत असून, हे शिबीर त्यांच्या वैज्ञानिक भविष्याचा पाया रचणारे ठरणार असल्याची भावना पुणे विभाग प्रमुख अमर परांजपे यांनी बोलून दाखवली आहे.




Be First to Comment