Press "Enter" to skip to content

‘महिला व बाल सुरक्षेसाठी विविध प्रतिबंधात्मक सुचविल्या उपाययोजना

“सरकारच्या महिला सुरक्षा अजेंड्याची पनवेलमध्ये प्रभावी अंमलबजावणी”- सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे

पनवेल : राज्यामध्ये महिला सुरक्षा, महिला सन्मान आणि बाल संरक्षणाला प्राधान्य देणाऱ्या महायुती सरकारच्या धोरणानुसार पनवेलमध्येही महिला व बाल सुरक्षेचा अजेंडा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याच अनुषंगाने आज कामोठे पोलीस ठाण्यास भेट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना महिला व बाल सुरक्षेबाबत विविध सकारात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, जनजागृती मोहीम, महिला हेल्पलाईन, पॉक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई आणि शालेय स्तरावरील सुरक्षा शिक्षण याला अधिक बळ देण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वयातून काम करण्याची आवश्यकता असल्याचे सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी यावेळी नमूद केले.

विशेष म्हणजे “Good Touch – Bad Touch” या शालेय जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होत असून अशा उपक्रमांचे सकारात्मक परिणाम समाजामध्ये दिसून येत आहेत. मुलांना लहान वयातच सुरक्षिततेबाबत योग्य मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवेदनामध्ये निवासी संकुल, सोसायट्या, मॉल, व्यावसायिक संकुले व सार्वजनिक ठिकाणी कार्यरत सुरक्षा रक्षकांची नियमित पोलीस पडताळणी करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची योग्य तपासणी झाल्यास नागरिकांमध्ये अधिक विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

सोसायटी कर्मचारी, हाऊसकीपिंग कर्मचारी, ड्रायव्हर, केअरटेकर व सुरक्षा रक्षकांसाठी महिला व बाल सुरक्षा विषयक संवेदनशीलता प्रशिक्षण आयोजित करण्याबाबतही सूचना करण्यात आली. महिलांशी सन्मानपूर्वक व सुरक्षिततेच्या दृष्टीने वागण्याबाबत सामाजिक भान निर्माण होण्यासाठी अशी प्रशिक्षण सत्रे उपयुक्त ठरतील, असे त्यांनी नमूद केले.

शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, क्रीडा संकुले व निवासी परिसरांमध्ये “Good Touch – Bad Touch”, बाल सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि पॉक्सो कायद्याबाबत नियमित जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढल्यास समाज अधिक सजग आणि सुरक्षित होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोसायटी परिसरातील CCTV यंत्रणा नियमित कार्यरत ठेवणे व त्याची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला व बाल सुरक्षेसंदर्भात हेल्पलाईन, समुपदेशन सेवा आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करण्याबाबतही निवेदनात सूचना करण्यात आल्या. महिलांना आणि मुलींना आत्मविश्वासाने तक्रार मांडता यावी यासाठी संवेदनशील आणि तत्पर व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोठ्या निवासी संकुलांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याबाबतही सूचना करण्यात आली. महिलांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरतील, असे त्यांनी सांगितले.

तसेच गृहनिर्माण संस्था, शाळा, सामाजिक संस्था, पोलीस प्रशासन, महिला व बाल विकास विभाग आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून महिला व बाल सुरक्षेसाठी विशेष जनजागृती आणि समन्वय उपक्रम राबविण्यासाठी महिला व बालकल्याण समितीमार्फत पुढाकार घेण्यात येणार असल्याचेही सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

“महिला सुरक्षा हा केवळ कायद्याचा विषय नसून समाजाच्या संवेदनशीलतेचा विषय आहे. राज्य शासनाच्या महिला सुरक्षा धोरणाला अधिक बळ देत पनवेलमध्ये महिलांसाठी सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत.”—
सौ. ममता प्रितम म्हात्रे
सभापती,
महिला व बालकल्याण समिती
पनवेल महानगरपालिका

यावेळी कामोठे मंडल भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक श्री. विकास घरत, महिला व बालकल्याण समिती सदस्य सौ. सरस्वती काथारा, सौ. अस्मिता घरत, सौ. प्रियंका कांडपिळे, सौ. कुसुम पाटील, अॅड. सौ.प्रतिभा भोईर, सौ. योगिता फडके, सौ. हेमलता गोवारी तसेच भाजप नेते श्री. सुरेश खरात उपस्थित होते. महिला व बाल सुरक्षेसंदर्भातील विविध उपाययोजनांबाबत सर्वांनी सकारात्मक चर्चा करत जनजागृती, समन्वय आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून पनवेलमध्ये अधिक सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याची भूमिका व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.