
खारघरमध्ये चाकू हल्ला करून ५७ तोळे सोन्याची लूट
खारघर : प्रतिनिधी
खारघर परिसरात चाकूने वार करून ५७ तोळे सोन्याचे दागिने जबरीने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे तसेच वाहनं हस्तगत करण्यात आली आहेत.
२२ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी सुशांत नामदेव मोरे (वय ३७, रा. खारघर) हे बेलापूर येथील हॉटेलमध्ये जेवण करून मित्रांसह घरी परतत असताना त्यांच्या घराजवळ तीन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर व मित्रांवर हल्ला केला. झटापटीदरम्यान फिर्यादीच्या हातावर चाकूने वार करून त्यांच्या चालकाकडील ५७ तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी लुटून आरोपी फरार झाले होते.

या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष तपास पथकांची नेमणूक करण्यात आली. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी यानेच पत्नी, मेहुणा व गावाकडील साथीदारांच्या मदतीने या लुटीचा कट रचला होता.
आतापर्यंत या गुन्ह्यातील सात आरोपींना सांगली, सातारा, सोलापूर व पंढरपूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी हे पालखी सोहळ्याच्या गर्दीत लपून फिरत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना पंढरपूर येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून लुटलेले ५७ तोळे सोन्याचे दागिने, चाकू, तसेच मारुती स्विफ्ट कार व रायडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत असून दोन आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास खारघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक डमाळे करत आहेत.




Be First to Comment