
लोकनेते रामशेठ ठाकूर, सौ. शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य गौरव
पनवेल (प्रतिनिधी ) रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःच्या दातृत्वाने शंभर कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करणारे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार, थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर तसेच ठाकूर इंफ्राप्रोजेक्ट लिमिटेडने यंदाही रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी ०३ कोटी ६२ लाख रुपयांची देणगी दिली असून त्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज (दि. ९ मे ) सातारा येथे कर्मवीर भूमीत जाहीर हृद्य सत्कार करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात कर्मवीर अण्णा यांचा ६७ वी पुण्यतिथी कार्यक्रम सातारा येथे समाधी परिसरात संपन्न झाला. यावेळी कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली यांच्या समाधीला अभिवादन करून हा समारंभ पार पडला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार व अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


आपल्याकडील पैशांचा दातृत्वाने सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे. रयत शिक्षण संस्थेचे ते माजी विद्यार्थी. ‘कमवा आणि शिका’ योजनेत त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांनी शिक्षक म्हणूनही संस्थेत सेवा केली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शहरांसोबतच आदिवासी व ग्रामीण भागातील रयत शिक्षण संस्थेच्या शाखांना वेळोवेळी गरजेनुसार उदार हस्ते मदत केली. संस्थेच्या गरजांवर तातडीने प्रतिसाद देण्याचे त्यांचे कार्य सतत सुरू असते. कर्मवीर अण्णांनी तळागाळात शिक्षणाची गंगा निर्माण केली. त्यांचे कार्य निरंतर सुरू राहिले पाहिजे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर अग्रेसर राहिले आहेत आणि तो वारसा ते चालवत आहेत. स्वतःची “जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था” असूनही, त्यांनी रयत संस्थेला मातृसंस्था मानून रयत शिक्षण संस्थेच्या मदतीला स्वतःला झोकून देत रयतला खंबीर साथ दिली आहे.संस्थेने सांगायचे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ताबडतोब अमंलबजावणी करायची हे समिकरण चालत आले आहे. “मळलेल्या वाटेने कोणीही जातो, पण न मळलेल्या वाटेने जाणारेच इतिहास घडवतात”, अत्यंत दुर्गम भागात शिक्षणाची पंढरी उभी करत शिक्षणाची उंची निर्माण केली आहे. त्यांच्या दानातून अनेक शाखा उभारल्या आणि त्यामुळे हजारोंच्या नाही तर लाखोच्या संख्येत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत आहे. कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजाचा विचार करत रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज संस्थेच्या साडेसातशेहून अधिक शाखांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या आणि पर्यायाने तळागाळातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कर्मवीर अण्णांचे कार्य पुढे घेऊन जाणारे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबाचे योगदान कायम अनमोल राहिले आहे. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी देणगी रूपाने विशेष योगदान देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर तसेच ठाकूर इंफ्राप्रोजेक्टच्यावतीने सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलचे चेअरमन व पनवेल महापालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर यांना हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, व्हॉईस चेअरमन भगीरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, उपाध्यक्ष महेंद्र लाड, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार चेतन तुपे, जे.के. जाधव, माईसरोज पाटील, मीनाताई जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या निमिताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना संस्थेच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेच्या विविध शाखांमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक विकास करून समाजाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणा-या संस्थेच्या विविध शाखांना ‘कर्मवीर पारितोषिक’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय क्रीडा क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करून रयत शिक्षण संस्थेचा लौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा आपल्या मनोगतातून मांडला. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले.



Be First to Comment