Press "Enter" to skip to content

संस्कारांच्या पाऊलखुणा…

उरणमध्ये रंगला ‘गुरुकुल बाल संस्कार शिबिरा’चा भावूक निरोप समारंभ ! गायिका पूनम पाटेकर यांच्या मार्गदर्शनाने मुलांच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा !

तृप्ती भोईर : उरण

मुलांच्या निरागस चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास आणि त्यांच्या वाणीतून उमटणारे स्तोत्र-मंत्रांचे पवित्र सूर… अशा अत्यंत मांगल्यामय वातावरणात नागाव रोड येथील माऊली मंगल कार्यालयात १ मे रोजी ‘गुरुकुल बाल संस्कार शिबिरा’चा निरोप समारंभ संपन्न झाला. १५ दिवसांपूर्वी सुरू झालेला हा संस्कारांचा प्रवास केवळ एक शिबिर न राहता, ४० चिमुरड्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक सोहळा ठरला.

या संपूर्ण शिबिराचा मुख्य आधारस्तंभ होत्या, नुकत्याच ‘भारतरत्न गौरव श्री’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रसिद्ध गायिका पूनम पाटेकर. गेल्या २वर्षांपासून बालसंस्कारांचे व्रत जोपासणाऱ्या पूनम मॅडम यांनी केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे, तर एका माऊलीच्या मायेने मुलांवर संस्कार केले. मुलांची बुद्धिमत्ता तल्लख व्हावी, त्यांची वाणी शुद्ध व्हावी आणि आधुनिक युगात वावरताना त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीची नाळ विसरू नये, यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणी जाणवत होती. निरोप समारंभात त्यांनी पालकांशी संवाद साधताना “संस्कार हीच मुलांच्या भविष्याची खरी संपत्ती आहे,” असे हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जेव्हा शिबिरात शिकलेली देशभक्तीपर गीते, मंत्र आणि नृत्याचे सादरीकरण केले, तेव्हा उपस्थित पालकांचे डोळे अभिमानाने भरून आले. मोबाईलच्या जगात हरवलेली मुले जेव्हा स्तोत्रपठण करू लागली तेव्हा कार्यक्रमात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. सामाजिक कार्यकर्त्या सानिका कदम आणि निसर्गोपचार तज्ञ हेमा घरात यांच्या मोलाच्या सहकार्याने मुलांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पालकांनी आपले अनुभव मांडले आणि आमची मुले बदलले आहेत त्यांच्यातील शिस्त आणि आदर वाढला आहे अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या श्री समर्थ सखी स्वयंसहायता संस्थेच्या अध्यक्षा संगीता ढेरे यांच्याकडून मिळालेल्या मायेच्या खाऊ आणि भेटवस्तूंनी मुलांचे चेहरे खुलले. जड अंतकरणाने पण समृद्ध आठवणी घेऊन मुलांनी या शिबिराचा निरोप घेतला सानिका कदम यांनी अत्यंत भावुक शब्दात सर्वांचे आभार मानले आणि या संस्काराच्या वाटेवर पुढे चालत राहण्याचा निर्धार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.