
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या काश्मीर अभ्यास दौऱ्याची यशस्वी सांगता
पनवेल प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संस्था असलेल्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ११ सदस्यांनी काश्मीरचा अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. सदर दौऱ्यात स्थानिक व्यावसायिक,पर्यटन स्थळे तसेच राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या गाठी भेटी घेत सदस्यांनी विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण गोष्टींचे अध्ययन केले.२६ एप्रिल रोजी सुरू झालेल्या दौऱ्याची महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी सांगता झाली.

अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या दौऱ्याचे संपूर्ण नियोजन सल्लागार विवेक पाटील, संजय कदम आणि मंदार दोंदे यांनी केले होते. विशेष म्हणजे मंचातील सदस्यांनी माजी खासदार लोकनेते दि बा पाटील(प्रस्तावित )नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट श्रीनगर फ्लाईटने उड्डाण केले तसेच थेट श्रीनगरहून याच विमानतळावरती लँडिंगचा अनुभव घेतला. बहुतांश सदस्यांनी प्रथमच नवी मुंबई विमानतळाचे अंतरंग एन्जॉय केले.या दौऱ्यात मंचातील सदस्यांनी श्रीनगर मध्ये शालीमार उद्यान, निशात उद्यान, दाचीगाम नॅशनल पार्क, चष्मेशाही उद्यान, शंकराचार्य हिल मंदिर, शिकारा मार्केटिंग, हाउस बोट स्टे यांचा आनंद लुटला.

पेहेलगाम येथे आरु वॅली, बेताब वॅली, ग्रीन वॅली, लिडार रिव्हर पॉईंट, हॉर्स रायडिंग यांचा मनमुराद आनंद मंचातील सदस्यांनी लुटला. श्रीनगर पेहेलगाम प्रवासात केसराच्या शेतजमिनी आणि क्रिकेट बॅट फॅक्टरी एक्सप्लोर करण्यात आले. अवंतीपुरा येथील विष्णू मंदिर भग्न अवशेष स्थानाला भेट देऊन त्याच्या इतिहासाचे अध्ययन सदस्यांनी केले. काश्मीर दौऱ्यातील सौंदर्याचे गंडस्थळ म्हणजे गुलमर्ग येथील गोंडोला राईड. शुभ्र बर्फाची चादर आणि हिमवर्षाव यांचा अवर्णनीय आनंद मंचातील सदस्यांनी अनुभवला. तब्बल १४ हजार फूट उंचीवरील सेकंड फेज वर हिमवर्षाव अनुभवत असताना अचानक हिम वादळ आले. भारतीय सेनेने तातडीने परिस्थितीचा ताबा घेत सर्व पर्यटकांना सुरक्षितरित्या रोप वे च्या सहाय्यतेने खाली उतरवले.

या अभ्यास दौऱ्यात मंचातील सदस्यांनी संयुक्त संसदीय समिती सदस्य खासदार एम के राघवन आणि खासदार सुरेंद्र चौधरी यांची भेट घेतली. यावेळी संसदीय संयुक्त समितीच्या कार्यपद्धती बाबत चर्चा करण्यात आली. खासदार एम के राघवन यांनी मंचातील सदस्यांना दिल्ली येथील निवासस्थानी आमंत्रित केले आहे. यासोबतच काश्मिरी गालिचा हातमाग कलाकारांची भेट, सफरचंद बाग आणि स्थानिक व्यंजनांचा आस्वाद सगळ्यांनी लुटला.
अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार विवेक पाटील, सल्लागार संजय कदम, सल्लागार मंदार दोंदे,उपाध्यक्ष दिपक घोसाळकर, सरचिटणीस हरेश साठे, खजिनदार दत्ता कुलकर्णी, प्रवीण मोहेकर, निलेश सोनावणे, लालचंद यादव, राजू गाडे यांनी काश्मीर अभ्यास दौऱ्यात सहभाग नोंदवला होता.


Be First to Comment