
बाप रे… कोंबड्यांच्या खुराड्यात घुसला सहा फुटी अजगर
खोपोली : प्रतिनिधी
खोपोली नगरपालिका हद्दीतील हाळ बुद्रुक गावात आज पहाटे एक थरारक घटना घडली. येथील रहिवासी अमजद सोंडे हे आपल्या घरालगत गावठी कोंबड्या आणि बकऱ्या पाळतात. पहाटेच्या सुमारास त्यांना कोंबड्यांच्या खुराड्यात काहीतरी संशयास्पद हालचाल जाणवली. जवळ जाऊन पाहिले असता अंदाजे सहा फुटी अजगर कोंबड्यांवर हल्ला करण्याच्या तयारीत दबा धरून बसलेला दिसून आला. ही बाब लक्षात येताच अमजद सोंडे यांनी तत्काळ हेल्प फाउंडेशनचे सर्पमित्र अमोल ठकेकर यांच्याशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच अमोल ठकेकर आणि गुरुनाथ साठेलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत कौशल्याने आणि कोणतीही हानी न करता त्यांनी त्या अजगराला सुरक्षितरीत्या जेरबंद केले.
अजगर पकडण्यात आल्यानंतर बराच वेळ दहशतीखाली असलेल्या कोंबड्यांचा कलकलाट थांबला आणि जणू काही त्यांनी सुटकेचा श्वास सोडल्याची जाणीव झाली.
विशेष म्हणजे, यापूर्वीही या भागात मुंगूस, अजगर तसेच घोणस जातीचे साप कोंबड्यांच्या पिंजऱ्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक वेळी हेल्प फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी तत्परतेने मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
आजच्या या धाडसी आणि वेळेवर केलेल्या कामगिरीबद्दल अमजद सोंडे यांनी हेल्प फाउंडेशनचे मनापासून आभार मानले आहेत.



Be First to Comment