Press "Enter" to skip to content

रायगड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

ऑनलाईन रमीच्या नादात गुन्हेगारीकडे वळलेला तरुण जेरबंद

ऑनलाईन रमी खेळात मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्याने कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका तरुणाने थेट गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारत घरफोड्यांचा सपाटा लावल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. मात्र, सतर्क आणि चाणाक्ष तपास करत रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या आरोपीचा पर्दाफाश करत त्याला जेरबंद केले असून एकाच आरोपीकडून तब्बल पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 27/2026 (भारतीय न्याय संहिता 2023, कलम 305) च्या अनुषंगाने सुरू असलेल्या तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपासाची सूत्रे हाती घेतली होती. पोलिस हवालदार अमोल हंबीर आणि पोलिस शिपाई ईश्वर लांबोटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करत संशयिताचा माग काढण्यात आला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचत पोलिसांनी आदित्य अमृत कुथे याला ताब्यात घेतले.

कडक चौकशीदरम्यान आरोपीने ऑनलाईन रमीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याने कर्ज फेडण्यासाठी घरफोड्या केल्याची कबुली दिली. आदित्य अमृत कुथे (वय 23, रा. शिहू-मुंढाणी, पोस्ट बेणसे, ता. पेण, जि. रायगड) याच्याकडून नागोठणे पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. 27/2026, 66/2025, 96/2025, 116/2024 व 166/2024 असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही संपूर्ण कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार सुधीर मोरे, प्रतीक सावंत, अमोल हंबीर, शरद फरांदे, रणजित खराडे तसेच पोलिस शिपाई ईश्वर लांबोटे व प्रदीप खरात यांनी या धडाकेबाज कारवाईत मोलाचा वाटा उचलला.

पोलिसांच्या दक्षतेला सलाम!
रायगड पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत, तांत्रिक कौशल्य आणि गोपनीय माहितीच्या अचूक वापराच्या जोरावर गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करत आरोपीला जेरबंद केले आहे. वाढत्या ऑनलाईन जुगाराच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आणि इशारा देणारी ठरते. समाजात कायद्याचा धाक कायम ठेवत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल नेहमीच सज्ज असल्याचे यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.