
रोहा येथे शानदार सोहळ्यात रायगड रत्न पुरस्कारांचे वितरण संपन्न
प्रतिनिधी / रोहा
दैनिक महासागराच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना रायगड रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रोहा अष्टमी येथील चिंतामणराव देशमुख सभागृहामध्ये शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी रायगड रत्न सन्मान हा शानदार सोहळा संपन्न झाला. विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे आणि सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांना रायगड रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९७१ साली संस्थापक संपादक श्रीकृष्ण चांडक यांनी विदर्भातून या नियतकालिकाची सुरुवात केली. गेल्या ५८ वर्षांमध्ये दैनिक महासागराच्या १८ आवृत्ती प्रसिद्ध होत आहेत. संस्थापक संपादक श्रीकृष्ण चांडक यांनी प्रास्ताविकातून महासागरच्या जडणघडणीचा संपूर्ण प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री गणेशाला वंदन करण्यात आले तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत समाजामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या प्रभूतींना या सन्मान सोहळ्यात रायगड रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मान सोहळ्यापूर्वी मिस्टर रायगड आणि मिसेस रायगड टायटल करिता फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंचावर पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे समन्वयक मंदार दोंदे, रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष वनश्री शेडगे, रिलायन्सचे सरव्यवस्थापक रमेश धनावडे, पनवेल महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी नितीन साके, जे एस डब्ल्यू चे जनसंपर्क अधिकारी कुमार थत्ते आणि भाजपा नेते राजेश मपारा यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी दैनिक महासागर रायगडामध्ये म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कार्यान्वित होत असल्याबद्दल वृत्त समूहाचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांनी संस्थापक संपादक श्रीकृष्ण चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बहरलेल्या दैनिक महासागर वृत्त समूहाची प्रशंसा केली. रोहा अष्टमीच्या नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी मनोगतातून दैनिक महासागर यांच्या रायगड जिल्ह्यातील यशस्वी वाटचाली करता शुभेच्छा दिल्या तसेच हा शानदार सोहळा रोहा नगरीत आयोजित केल्याबद्दल वृत्त समूहाचे विशेषत्वाने कौतुक केले.
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे समन्वयक मंदार दोंदे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की पत्रकारिता क्षेत्र दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. पूर्वीच्या काळी प्रिंट मीडियामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी एक दिवस जिवंत राहायची कालांतराने ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांमध्ये बातमीचे सेल्फ लाइफ अवघे एक तास झाले. आता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तीच बातमी अवघी १० मिनिटे ताजी असते. त्यामुळे वार्ताहर प्रतिनिधींना जलद आणि अचूक पद्धतीने काम करावे लागेल. विशेष अतिथी जान्हवी किल्लेकर यांनी रायगड रत्न कार्यक्रमाकरिता तिला अर्थात रायगडाच्या मातीतल्या मुलीला आमंत्रित केल्याबद्दल दैनिक महासागर वृत्त समूहाचे आभार मानले.
पहिली मटा श्रावण क्वीन आणि मिसेस वर्ल्ड २०१७ कल्पिता राणे यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. विशाखा गुरव यांनी मिसेस रायगड हे टायटल जिंकले तर साक्षी पुजारी या पहिल्या रनर अप ठरल्या. मिस रायगड हे टायटल प्रिया पाटील हिने पटकावले तर वैष्णवी चाळके फर्स्ट रनर अप आणि सिमरन गमरे सेकंड रनर अप ठरल्या. जस्मित चिले याने मिस्टर रायगड हे टायटल पटकावले तर सनी मेहेर आणि अक्षय बचम यांना अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दैनिक महासागर से महाव्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये अथक परिश्रम घेतल्यामुळे हा भव्य दिव्य आणि शानदार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या नियोजना करता अरुणा कुलकर्णी,श्रीकांत नांदगावकर, दिनेश सुतार, समीर घायतळे, संतोष सातपुते,दीप वायडेकर, राम भोसतेकर, संजय मांजरेकर, सोपान निंबरे, निलेश लोखंडे, महेश चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.

सामाजिक राजकीय क्रीडा संस्कृती शिक्षण कला अशा विविध क्षेत्रातील ५० प्रभुतीना यावेळी आकर्षक प्रशस्तीपत्र नेत्रदीपक सन्मानचिन्ह आणि शाल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार विकास मंच या सजग पत्रकारांच्या नोंदणीकृत संस्थेला या सन्मान सोहळ्यात संघटनात्मक पत्रकारिता क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. मंचाच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार विवेक पाटील, सल्लागार संजय कदम, सल्लागार मंदार दोंदे, खजिनदार दत्तात्रय कुलकर्णी,निलेश सोनवणे प्रवीण मोहोकर भरत कुमार कांबळे यांनी सन्मान स्वीकारला.




Be First to Comment