Press "Enter" to skip to content

५४ विद्यार्थ्यांना ९५%पेक्षा अधिक गुण

सीबीएसई दहावीच्या परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल

पनवेल (प्रतिनिधी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घोषित केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने नेत्रदीपक यश संपादन करत आपला दबदबा कायम राखला आहे. यंदाही शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेस बसलेले सर्व ३१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेची विद्यार्थिनी अनन्या प्रवीणकुमार भुतडा हिने ९९.२० टक्के गुण मिळवून संपूर्ण नवी मुंबईत प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे.
         

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अव्वल अनन्या भुतडा हिच्यासह सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे अनन्याला २५ हजार, तर द्वितीय मित्तल सुजाभाई पटेल (९८.६० टक्के), तृतीय देवांश विशाल जाधव (९८.४० टक्के), चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकावणारे विद्यार्थी अनुक्रमे अर्णव भारत पाटील आणि विराज संजय अरगडे (दोघांनाही ९८ टक्के) यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
           

अनन्याने मराठी आणि डेटा सायन्स या विषयांमध्ये १००पैकी १०० गुण मिळवून आपल्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. केवळ वैयक्तिक यशच नव्हे तर शाळेच्या एकूण कामगिरीचा आलेखही उंचावलेला दिसतो. एकूण विद्यार्थ्यांपैकी ५४ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक, १३७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्‍यांहून अधिक, तर २८६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

विषयनिहाय कामगिरीतही शाळेने बाजी मारली आहे. शाळेतील २७ विद्यार्थ्यांनी डेटा सायन्समध्ये, १६ विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, तर सहा विद्यार्थ्यांनी मराठी विषयात १००पैकी १०० गुण मिळवले आहेत. याशिवाय इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र विषयातही प्रत्येकी एका विद्यार्थ्याने पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची कामगिरी केली आहे.

या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे, सदस्य ॲड. राहुल घरत तसेच प्राचार्या राज अलोनी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच शिक्षक व पालकांच्या सहकार्याचाही उल्लेख केला. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या निकालामुळे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने शैक्षणिक क्षेत्रातील आपले अग्रस्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.