Press "Enter" to skip to content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन 

पत्रकारांसाठी लोणावळ्यात फाईव्हस्टार दर्जाचे विश्रामधाम साकार

पनवेल (प्रतिनिधी) मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या लोणावळा येथील कै. दी. गो. तेंडुलकर स्मृती विश्रामधामाच्या विस्तारित व अत्याधुनिक कक्षाचे उद्घाटन जल्लोषात पार पडले. जलतरण तलावासह फाईव्हस्टार दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या या विश्रामधामामुळे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक उत्कृष्ट पर्यटन व विश्रांती केंद्र निर्माण झाले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या सामाजिक कार्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भरघोस अशी ७० लाख रुपयांची देणगी दिली आहे. या विश्रामधामाच्या विस्तारित व अत्याधुनिक कक्षाचे उद्घाटन दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, इतक्या अल्प कालावधीत नूतनीकरणाचे काम पूर्ण करणे हे अत्यंत कठीण कार्य होते. मात्र संघाच्या कार्यकारिणीने ते शक्य करून दाखवले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. हे विश्रामधाम पत्रकारांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक आदर्श पर्यटन पर्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, खजिनदार जगदीश भोवड तसेच विश्वस्त राही भिडे, दीपक म्हात्रे, अजय वैद्य आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले की, संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हे अत्याधुनिक विश्रामधाम पूर्ण करण्याचा योग साधला गेला आहे. फाईव्हस्टार दर्जाच्या सुविधा देतानाच या वास्तूचे सांस्कृतिक मूल्य जपण्याचे मोठे आव्हान कार्यकारिणीने यशस्वीपणे पार पाडले आहे. कामगार नेते महेंद्र घरत यांनी विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या या प्रकल्पाबद्दल कार्यकारिणीचे कौतुक केले. मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी हे ठिकाण उत्तम पर्यटन पर्याय ठरेल, असे मत व्यक्त केले. तर माजी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी या प्रकल्पासाठी लोणावळा नगर परिषदेकडून संपूर्ण सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

सुमारे ५० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले हे विश्रामधाम कालांतराने जीर्ण झाले होते. पत्रकारांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन यामध्ये चार अतिरिक्त बेडरूम, अत्याधुनिक सुविधा आणि स्विमिंग पूलची उभारणी करण्यात आली आहे. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना या सर्व सुविधा अल्प दरात उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे यांनी केले, प्रास्ताविक शैलेंद्र शिर्के यांनी सादर केले, तर उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.