


खोपोली प्रतिनिधी : दिनकर भुजबळ
खोपोली येथे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त “आम्ही खोपोलीकर आमचं ठरलय” संघटनेच्या वतीने पाचव्या वर्षी आयोजित रथयात्रा व बाईक रॅली उत्साहात पार पडली. या उपक्रमाला समस्त खोपोलीकरांनी प्रारंभापासून शेवटपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (शिळफाटा) येथे पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हिरे, माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील, बांधकाम सभापती अनिल सानप, नगरसेविका सुवर्णा मोरे, ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ, तसेच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. “शिवाजी महाराज की जय” आणि “महात्मा फुले विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
रॅलीदरम्यान श्री. प्रमोद गायकवाड व सौ. वर्षा मोरे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतून साकारलेली भूमिका विशेष आकर्षण ठरली. शिळफाटा ते खोपोली बाजारपेठ मार्गे डॉ. बी . आर . आंबेडकर स्मारकापर्यंत रथयात्रा काढून तेथे पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करत समाजप्रबोधन, स्त्री शिक्षण आणि समतेच्या विचारांची गरज अधोरेखित केली. लहानगी कु. रुत्वा प्रशांत संकपाळ हिने महात्मा फुले यांच्याविषयी दिलेली माहिती विशेष दाद मिळवणारी ठरली.
यावेळी श्री. महेश काजळे यांनी खोपोली शहरात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज , छत्रपती संभाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांची उभारणी करण्याची मागणी उपस्थित मान्यवरांसमोर मांडली. यावर बांधकाम सभापती अनिल सानप यांनी ही मागणी योग्य असून ती परिषदेमार्फत पुढे नेण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमासाठी खोपोली पोलीस ठाणे व खालापूर तहसील कार्यालयाचे सहकार्य लाभले. पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध नियोजन करत कार्यक्रम यशस्वी केला.
सदर कार्यक्रमास समस्त खोपोलीकर, महात्मा फुले अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले समन्वय समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. विशेष सहकार्य शाहिद शफी शेख व इरफान शफी शेख यांनी रथ उपलब्ध करून दिल्याने लाभले.





Be First to Comment