
श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट, श्री पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट, विद्यार्थी वाहक संस्था,पनवेल तालुका पत्रकार विकास मंच यांच्या मोफत आरोग्य तपासणीचा घेतला शेकडो रुग्णांनी लाभ
पनवेल / प्रतिनिधी
श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट, श्री पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट, विद्यार्थी वाहक संस्था,पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि अन्य सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन भाई पाटील यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. येथील श्रीपूज्य सिंधी पंचायत झुलेलाल मंदिर या ठिकाणी संपन्न झालेल्या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला तर ८७ दात्यांनी रक्त दिले. शिबिरा करता १०९ रक्तदात्यांनी नोंदणी केलेली होती परंतु वैद्यकीय तांत्रिक कारणांमुळे २२ रक्तदात्यांचे रक्त नाकारले गेले.
मुख्य आयोजक ऍड मनोहर सचदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जाणारे हे तिसावे रक्तदान शिबिर होते. या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते तसेच विविध तज्ञ वक्त्यांची अवयव दानाचे महत्त्व विशद करणारी व्याख्याने देखील आयोजित करण्यात आली होती. ब्लडप्रेशर, ब्लड शुगर, यांच्या तपासणी बरोबरच ई सी जी सेवा संपूर्णपणे विनामूल्य प्रदान करण्यात येत होत्या.
मुख्य आयोजक एडवोकेट मनोहर सचदेव यावेळी म्हणाले की कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या वेळेस रक्ताची फार चणचण भासू लागली होती. त्यामुळे रक्तपेढ्यांच्यात रक्त शोधण्यापेक्षा आपणच रक्तदान करावे हा विचार माझ्या मनात आला. माझ्या या प्रयत्नात समविचारी सहकारी आणि संघटना जोडत गेल्या. आज तब्बल तिसावे रक्तदान शिबिर आयोजित करताना समाधान लाभत आहे. आम्ही हेतू पुरस्सर पणे तीन महिन्यांनी पुढचे शिबिर आयोजित करतो ज्यामुळे आमच्या शिबिरामध्ये नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ते सोयीस्कर पडेल. या रक्तदान शिबिरासाठी लागणारे ब्लड कलेक्शन अप्रेटस एमजीएम हॉस्पिटल यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की थैलेसिमिया सारख्या व्याधींनी ग्रस्त रुग्णांच्या करीता मुबलक रक्त मिळावे हा देखील शिबिर आयोजित करण्या पाठीमागचा मुख्य मुद्दा आहे. पुढील रक्तदान शिबिर १२ जुलै रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिर आणि विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनासाठी एड.मनोहर सचदेव यांच्या समवेत एड. अमोल साखरे मुरलीधर डाके पांडुरंग हुमणे, किसन रौंढल यांनी अथक परिश्रम घेतले.

मी वयाच्या २१ व्या वर्षापासून रक्तदान करत आहे. शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनाला गेलो असता मी सर्वप्रथम रक्तदान केले. तेव्हापासून आज पर्यंत गेले ३० वर्ष मी नित्यनियमाने रक्तदान करतो. रक्तदान केल्यावरती माझ्या मनात समाधानाची भावना जागृत होते. एरवी आपण कधीच कुणाला काही देत नसतो. निसर्गाने अशी किमया केली आहे की आपण रक्त दिल्यानंतर आपले शरीर ते पुनर निर्माण करते. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव देखील वाचू शकतो. म्हणून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. मी या शिबिरामध्ये नेहमीच रक्तदान करतो.
- सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पाडळकर

मी नियमित रक्तदाता आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदान केल्याने त्याचा आपल्या शरीराला देखील फायदा होतो. रक्तदान ही आपल्या सगळ्यांची सामाजिक जबाबदारी आहे.
विवेक मोरेश्वर पाटील, पत्रकार
सल्लागार - पनवेल तालुका पत्रकार विकास मंच.




Be First to Comment