
पुरवठा शाखा कार्यालय नवीन प्रशासकीय भवनात स्थलांतरित करा
पनवेल येथील रास्त भाव धान्य पुरवठा शाखा कार्यालय सध्या अनेक समस्यांच्या विळख्यात असून, ते तातडीने शहरातील नवीन प्रशासकीय भवनात स्थलांतरित करावे, अशी मागणी निलेश सोनावणे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सद्यस्थिती आणि समस्या:
सध्या हे कार्यालय साई नगर जवळील तहसील कार्यालयाच्या तळमजल्यावर कार्यरत आहे. मात्र, या ठिकाणी कार्यालयाची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे सोनावणे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यांच्या मागणीनुसार मुख्य समस्या खालीलप्रमाणे आहेत:
जागेची कमतरता: कार्यालयात कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी आणि नागरिकांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही.
कागदपत्रांचे नुकसान: कार्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांना वाळवी लागली असून, शासनाचे रेकॉर्ड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
असुविधा: रेशन कार्ड, नवीन धान्य दुकान परवाना आणि तक्रार निवारणासाठी येणाऱ्या नागरिकांना बस डेपोपासून रिक्षा ने यावे लागते त्यामुळे अधिक खर्चिक होते त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो.
प्रशासकीय भवनाचा पर्याय:
पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोर नवीन प्रशासकीय भवन उभारण्यात आले आहे. हे भवन सुसज्ज असून त्या ठिकाणी पुरवठा विभागाला पुरेशी जागा उपलब्ध होऊ शकते. तसेच तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिकांना सहज रित्या या ठिकाणी पोहचता येईल
“पुरवठा विभागाचा थेट संबंध सर्वसामान्य नागरिकांशी आणि त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाशी येतो. अशा महत्त्वाच्या विभागाचे कार्यालय हे शहराच्या एका टोकाला आहे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरीकांना या ठिकाणी येण्यासाठी प्रवास खर्च अधिक होतो तर या ठिकाणी अपुरी जागा असल्याने कर्मचाऱ्यांच्या , कामावर परिणाम होतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हे कार्यालय नवीन प्रशासकीय भवनात हलवावे.”
— निलेश सोनावणे (अध्यक्ष, आरपीआय पनवेल शहर)



Be First to Comment