Press "Enter" to skip to content

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचासोबत वार्तालाप

जिल्ह्यातील एकही अंगणवाडी अंधारात राहणार नाही…
— राजिप अध्यक्ष, मंगेश वाकडीकर

वार्तालाप कार्यक्रमात राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी शेअर केले व्हिजन

पनवेल / प्रतिनिधी
पनवेल मधील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संस्था असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने रविवार दिनांक २९ मार्च रोजी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या समवेत वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंचातील तमाम सदस्यांनी मंगेश वाकडीकर यांचा यावेळी सत्कार करून त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मंगेश वाकडीकर यांनी अत्यंत विस्तृतपणे त्यांची कार्यपद्धती आणि व्हिजन हे मंचातील सदस्यांसमवेत शेअर केले. दोन दिवसांपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत देखील मंगेश वाकडीकर यांनी विस्तृत विवेचन केले. या अर्थसंकल्पामध्ये जवळपास ७०० अंगणवाड्यांवरती विद्युत जोडणी न झाल्याचा मुद्दा अग्रस्थानी ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले. हा मुद्दा आम्ही प्राधान्य क्रमाने हाती घेत जिल्ह्यामधील एकही अंगणवाडी अंधारात ठेवणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जल जीवन मिशन,जलदुर्ग संवर्धन, सागरी पर्यटनाला चालना, ऐतिहासिक वारसा स्थळांचे सुशोभीकरण, आरोग्य अशा विविध विषयांवर मंचातील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंगेश वाकडीकर यांनी अत्यंत अध्ययनपूर्ण उत्तर देत त्यांच्यातल्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दाखविली. सल्लागार मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले तर सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी आपले मनोगतातून मंगेश वाकडीकर यांना शुभेच्छा दिल्या

मंगेश वाकडीकर यांच्या समवेत संपन्न झालेल्या वार्तालाप कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार तथा सल्लागार माधव पाटील, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार विवेक पाटील सल्लागार संजय कदम सल्लागार मंदार दोंदे, सरचिटणीस हरेश साठे, उपसचिव राजू गाडे, निलेश सोनवणे, प्रवीण मोहोकर, लालचंद यादव, सुनील राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलेले आहे, मला बँकिंग सेक्टरचा अनुभव आहे. अनेक जनकेंद्रित समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा मला अनुभव आहे. रायगड प्रीमियर लीग च्या अनुषंगाने क्रीडा क्षेत्राचा देखील मला अनुभव आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संघटन करण्यासाठी देखील मी सक्रिय आहे आणि यासोबतच मला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्यासह आमच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आहे. या पाठबळाच्या शिदोरीच्या जोरावर मी निश्चितच लक्षणीय कामगिरी करून दाखवेन.

….मंगेश वाकडीकर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.