Press "Enter" to skip to content

चोळे, शिहू, बेणसे, मुंढाणी शाळांना भेट

जिल्हा परिषदेच्या शाळांना स्मार्ट बनवण्यासाठी सदस्या पल्लवी भोईर यांच्याकडून पाहणी

पेण, ता. २८ (वार्ताहर) : पेणच्या ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याच्या निर्धाराने रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या पल्लवी प्रसाद भोईर यांनी आज अचानकपणे जिल्हा परिषदेच्या चोळे, शिहू, बेणसे तसेच मुंढाणी येथील शाळांना भेट देत शाळांसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांची सखोल तपासणी केली.

एकीकडे शैक्षणिक क्षेत्रात खाजगी शाळा कॉलेजेस मोठ्या प्रमाणावर वाढत असताना रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये शिकत असणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या शाळा स्मार्ट व्हावी हा उद्देश असून शासनाने अशा ग्रामीण भागातील प्रत्येक शाळा स्मार्ट व डिजिटल करून घेणे आवश्यक आहे. इनोव्हेटिव्ह उपक्रम राबवावे, शाळेत डिजिटल क्लासरूम व व्हर्च्युअल लर्निंग सेटअप, ई-लर्निंग कंटेंट व स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, मिनी ग्रंथालय व ‘एक विद्यार्थी एक पुस्तक’ हा उपक्रम सुरू करावा, स्किल-बेस्ड शिक्षण (कंप्युटर, बेसिक टेक्नॉलॉजी, संवाद कौशल्य) कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष क्लासेस, करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा तयारीची प्राथमिक ओळख, शाळांमध्ये स्वच्छ, हरित व तंत्रज्ञानयुक्त वातावरण यास इतर शैक्षणिक गुणवत्ता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाव्यात जेणेकरून इतर विद्यार्थ्यांबरोबर त्यांची ही शैक्षणिक गुणवत्ता वाढेल याकरिता आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून त्यांनी यावेळी शाळेतील भौतिक सुविधा, शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेत त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

यावेळी पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती संजय भोईर, माजी सरपंच विश्वास मोकल भास्कर म्हात्रे, माजी उपसरपंच घनश्याम कुथे, सुजित गदमळे, दिपक पाटील, प्रविण कुथे, चंद्रकांत म्हात्रे, हेमंत मोकल, नरेश म्हात्रे आदींसह संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.