
खोपोली च्या गारमाळ परिसरात बिबट्याचा वावर; वन विभागाचे सतर्कतेचे आवाहन
खोपोली : प्रतिनिधी
खोपोली गारमाळ परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी गारमाळ रस्त्यावर बिबट्या दिसल्याची घटना घडल्याने या भागात वन्यजीवांची उपस्थिती अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर खालापूर तालुका वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
खालापूर तालुका वनाधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भगवान दळवी, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर तसेच वनकर्मचारी घुटे, नागरगोजे, काटकर आणि प्राणीमित्रांच्या सहकार्याने गारमाळ परिसरातील जंगल व दरी भागात सर्वेक्षण करण्यात आले. या पाहणीदरम्यान वन्य प्राण्यांसाठी असलेले नैसर्गिक पाणवठे शोधून त्यातील गाळ काढून स्वच्छ करण्यात आले.
सदर सर्वेक्षणात तीन ठिकाणी बिबट्याची विष्ठा आढळून आली, तर काही ठिकाणी साळींदर, व इतर या प्राण्यांच्या पायांचे ठसेही दिसून आले. त्यामुळे या परिसरात बिबट्या आणि अन्य प्राण्यांचा सक्रिय वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर अहिल फेन्स अँड गॅबियनचे डायरेक्टर अशपाक लोगडे, हेल्प फाउंडेशनचे सदस्य अमोल कदम, अमोल ठकेकर, दिनेश ओसवाल, निलेश कुदळे, महेश भोसले, भक्ती साठेलकर, शंतनु खरे इत्यादी सदस्यांनी तालुका वन विभागातील कर्मचारी यांचे सोबत गस्त घालण्याची तयारी दर्शवली आहे. या पुढाकारामुळे वन विभागाच्या कार्याला बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
वन विभागाच्या वतीने परिसरात “बिबट्याचा वावर आहे, काळजी घ्या” अशा आशयाचे फलक लावण्यात आले असून नागरिकांनी विशेषतः सकाळ – संध्याकाळच्या वेळेत अधिक दक्षता घ्यावी, एकट्याने जंगल भागात जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभाग किंवा स्थानिक प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वन विभागाच्या या उपाययोजनांबरोबरच सामाजिक स्तरावरून मिळणाऱ्या सहकार्यामुळे संभाव्य धोका टाळण्यास मदत होणार असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.



Be First to Comment