Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

२५ मार्चपासून रायगड जिल्हा कबड्डी संघाचे सराव शिबीर

पनवेल (प्रतिनिधी) दिनांक २ एप्रिल ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत सिन्नर (जि. नाशिक) येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पुरुष व महिला कबड्डी संघांचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने हे शिबीर दि. २५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत पनवेल येथे उत्साहात पार पडणार आहे. दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विशेष कबड्डी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिराचे आयोजन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील तसेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह चित्रा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सक्षम तयारी व्हावी, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे. या शिबिरामध्ये पुरुष संघातील १४ खेळाडू व २ प्रशिक्षक तसेच महिला संघातील १४ खेळाडू व २ प्रशिक्षक अशा एकूण ३२ जणांचा सहभाग असणार आहे. सर्व खेळाडूंसाठी निवास, भोजन व इतर आवश्यक सुविधांची उत्तम व नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक खेळाडूस संपूर्ण स्पोर्ट्स किट्स श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे प्रदान करण्यात येणार आहेत.

खांदा कॉलनीतील सिकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या शिबिराचे उद्घाटन बुधवार दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन समारंभाला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कबड्डीप्रेमी उपस्थित राहणार आहेत. शिबिराची संपूर्ण तयारी शिबीर प्रमुख आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम तसेच छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे खेळाडूंना तांत्रिक, शारीरिक व मानसिक पातळीवर सक्षम बनविण्यात येणार आहे. या शिबिरातून तयार होणारा रायगड जिल्हा कबड्डी संघ आगामी राज्य स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील कबड्डी खेळाला निश्चितच चालना मिळणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.