Press "Enter" to skip to content

अलिबागमधील वावे गावात भव्य श्रीरामजन्मोत्सव सोहळा


वावे – अलिबाग ( प्रतिनिधी –दिनेश तुरे ) :- सालाबादप्रमाणे मुक्काम -वावे , तालुका- अलिबाग , जिल्हा –रायगड, येथे चैत्र शु .९ , श्री शालिवाहन शके १९४८ , गुरुवार दिनांक – २६ मार्च २०२६ रोजी ७७ व्या श्रीरामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, सकाळी ९.०० वाजता श्रीरामप्रासादिक भजन मंडळ वावे : बुवा – श्री बळीराम गावंड ( संगीत विशारद बाबुराव वाघमारे यांचे शिष्य ) तसेच मृदंगमणी – श्री हरिश्चंद्र नथुराम गावंड , श्री दामोदर गावंड , श्री जनार्दन गावंड ( संगीत विशारद बाबुराव वाघमारे यांचे शिष्य ) , चालक श्री दिलीप पाटील , श्री संदीप गायकर , मॅनेजर श्री वसंत गावंड यांचे सुश्राव्य भजन होणार आहे .

श्रीरामप्रभुंच्या जन्मसोहळ्याचे पोथीवाचन सकाळी – १०.०० ते १२.३० यावेळेत होणार आहे. श्रीरामनवमी दिवशी दुपारी १२.३० वाजता मर्यादापुरुषोत्तम श्रीरामप्रभुंचा जन्मोत्सवाचा सोहळा भक्तिभावे संपन्न होणार आहे. तसेच भक्तजनांसाठी महाप्रसादाची व्यवस्था दुपारी १ .०० ते ४.०० यावेळेत असणार आहे. तसेच भक्तजनांच्या मनोजनार्थ पंचक्रोशीतील : बेलोशी, महाजने , आंदोशी, उसर , वळवली , आंबेपूर , या सहा भजनी मंडळांचे कार्यक्रम दुपारी १ ते रात्रौ ७ यावेळेत होणार आहेत , त्यामुळे भक्तजनांना संगीतमय मधुर स्वरांचा आनंदमय आस्वाद मिळणार आहे . श्रीरामप्रभूंची पालखी रात्रौ ९.०० वाजता विविध सजावटीने सजविलेला श्रीरामरथ चलचित्र पालखी सोहळा सोबत देवेश बेंजोपथक वावे , शिवबा म्युझिकल ग्रुप फणसापुर, यांच्या वाद्य व म्युझिकचा नयनरम्य आस्वाद, तसेच विभागातील ताशापथक हरिश्चंद्र सांदणकर ,आत्माराम थळे, व इतर मित्रमंडळी यांचा ताशांचा सुंदर स्वर घुमणार आहे आणि पालखीसोबत वावे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील आंदोशी, चिंचोटी , घोटवडे , बेलोशी , महाजने, या लेझीम पथकांची रंगत पहायला मिळणार आहे, अशी भव्य पालखी मिरवणुक गावातुन काढण्यात येणार आहे.

पालखीसोबत : बोरपाडा , कुंठयाची गोठी, आंदोशी , बेलोशी , महाजने, या पंचक्रोशीतील व गावातील टाळमृदूंगधारी वारकरीभजने व भावगीते होणार आहेत . डेकोरेशन व ध्वनी : गावदेवी साउंड सर्वीस व डेकोरेटर आंदोशी यांचे आहे . वेशभूषा – स्वराली ड्रेसेस थेरोंडा सौ . विनोदिनी कोंडे व रंगभूषा –महेंद्र गावंड यांची असणार आहे . तसेच वेषभुषाधारक भाविक ग्रामस्थ हे श्रीरामप्रभूंच्या पालखीचे प्रमुख आकर्षण असणार आहे. श्रीरामप्रभूंच्या पालखीसोहळ्यात गुलालाची चौफेर उधळण करून ग्रामस्थ आपला आनंद साजरा करतात , तसेच जय हनुमान लाठीकाठी आखाडा भोनंग यांचे , लाठी – काठी व मल्लखांब अशा मैदानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके श्रीराम मंदिराच्या प्रांगणात दाखविण्यात येणार आहेत. आकर्षक व मनमोहक रोषणाईने श्रीराममंदिर उजळून निघणार आहे.

टाळमृदूंगाच्या नादात भक्तीमय वातावरणात या अविस्मरणीय अशा श्रीरामप्रभुंच्या भक्तिमय आनंद जन्मोत्सव सोहळ्याचा व तीर्थप्रसादाचा तसेच महाप्रसादाचा लाभ सर्वभाविकांनी घ्यावा व याचीदेही ,याची डोळा अशा या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद आपण सर्वानी द्विगुणीत करावा असे आवाहन वावे ग्रामस्थांच्यावतीने : श्री दिनेश हरिश्चंद्र तुरे ( मुक्त – पत्रकार व वृत्तपत्रलेखक ) यांनी केले आहे. तसेच नाट्यरसिकांच्या मनोरंजनार्थ शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ रोजी रात्रौ १०.०० वाजता “ दिल्या घरी सुखी रहा…..“ या दोन अंकी सामाजिक व कौटुंबिक नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. अशा प्रकारे यादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वावे ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे . श्रीरामप्रभुंच्या चरणी नतमस्तक होऊन अलोट भक्ती द्वारे या मंगलमय भक्तीमय सोहळ्याचा आनंद आपण सर्वानी लुटूया ! एक ही नारा जय श्रीराम ! एकही नाम जय श्रीरामप्रभु ! श्रीराम जय राम ! जय जय राम !!

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.