Press "Enter" to skip to content

सशक्त महिला, सक्षम समाजासाठी कटिबद्ध


सौ. ममताताई प्रितम म्हात्रे यांची पनवेल महानगरपालिका महिला-बालकल्याण समिती सभापतीपदी निवड

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधील कार्यक्षम, लोकाभिमुख व विकासाभिमुख नगरसेविका सौ. ममताताई प्रितम म्हात्रे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सौ. ममता प्रितम म्हात्रे या २०१० पासून सामाजिक कार्यात सक्रिय असून २०२५ मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले. फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतलेल्या सौ. म्हात्रे या प्रभाग क्रमांक १८ मध्ये एक संवेदनशील, तत्पर आणि उत्तरदायी लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात. “राजकारणापेक्षा समाजकारण” या विचारसरणीवर विश्वास ठेवत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची कार्यपद्धती जपली आहे.
मा.खासदार श्री. रामशेठ ठाकूर आणि मा. नगराध्यक्ष श्री.जे.एम. म्हात्रे यांचे आशीर्वाद तसेच आमदार श्री.प्रशांत ठाकूर , मा.विरोधीपक्ष नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांचे मार्गदर्शनपर नेतृत्व यामुळेच त्यांच्या कार्याला दिशा व बळ मिळाले असून, या सर्व वरिष्ठांच्या प्रेरणेतूनच त्यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निवड झाल्याचे मानले जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या मूलमंत्रानुसार त्यांनी आपल्या कार्यात सर्वसमावेशक विकास, पारदर्शकता, सेवा भाव व जनहित या नीतिमूल्यांना प्राधान्य दिले आहे.

महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी गेली १५ वर्षे सातत्याने काम करत १००% महिलांच्या व्यापारी-ग्राहक पेठांचे आयोजन, महिला बचतगटांना आर्थिक व प्रशिक्षण सहाय्य, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. भारतीय जनता पक्षाचा “सशक्त महिला – सक्षम समाज” हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून साकारला आहे.

आरोग्य सेवेत त्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, महिलांसाठी थायरॉईड व HBA1C तपासण्या, चष्मा वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, औषध वितरण यांसारख्या उपक्रमांद्वारे हजारो नागरिकांना दिलासा दिला आहे. “प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार” या संकल्पनेला त्यांनी प्राधान्य दिले आहे.

रोजगार निर्मिती व युवक सक्षमीकरणासाठी त्यांनी रायगड व नवी मुंबई परिसरात १०,००० हून अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात योगदान दिले आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योग क्षेत्राशी समन्वय व विशेषतः दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात युवकांना मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

शिक्षण व क्रीडा क्षेत्रात त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या काळातही त्यांनी संवेदनशील नेतृत्व करत पूरग्रस्त, आपत्तीग्रस्त कुटुंबांना अन्न, निवारा व जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. धाराशिव, इरशाळवाडी, महाड महापूर, निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ अशा विविध प्रसंगी त्यांनी मदतीचा हात दिला आहे.
आध्यात्मिक व सेवाभावी कार्यातही त्यांनी श्री क्षेत्र पंचायतन मंदिर, नढाळ (चौक) येथे भाविकांसाठी निवास, अन्नप्रसाद, मोफत सेवा तसेच शिक्षण व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून “सेवा हीच साधना” हा विचार रुजविला आहे.

महिला व बालकल्याण क्षेत्रातील त्यांच्या व्यापक अनुभवाचा व उल्लेखनीय कार्याचा विचार करूनच त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळून समाजातील दुर्बल घटकांना अधिक सक्षम आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांनी भविष्यातही समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देत राहावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

“मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.रवींद्रजी चव्हाण आणि भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ.चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या महिला सक्षमीकरण, आरोग्य व रोजगारविषयक धोरणांना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा मी दृढ संकल्प करते. मिळालेल्या या जबाबदारीचे संधीमध्ये रूपांतर करून शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सकारात्मक आणि परिणामकारक काम करण्याचा माझा निर्धार आहे.”

सौ.ममताताई प्रितम म्हात्रे
सभापती, महिला-बालकल्याण समिती
पनवेल महानगरपालिका

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.