
मुलुंड मध्ये बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण
मुंबई : सतीश पाटील
मुलुंड पश्चिम येथील सरदार तारासिंग उद्यानाजवळ असलेल्या साई प्रस्थ येथे बिबट्या आल्याने स्थानिक नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा बिबट्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून साई प्रस्थ येथे येऊन कुत्र्याची शिकार केली. या भागात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या दिसून आल्याने आता नागरीकांची झोप उडाली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला अनेक ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने अनेकदा शिकारीच्या शोधात बिबटे नागरी वस्तीत येतात. घाटकोपर ते मुलुंड या भागात अनेकदा बिबट्यांनी नागरीकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. त्यात काहींचा मृत्यूही झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अनेकदा हे बिबटे कुत्र्यांची शिकार करीत असल्याचे दिसून आले आहे. नागरी वस्तीत त्यांचा वावर वाढल्याने स्थानिक नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वन विभागाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सिमेवर संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार केली आहे. याबाबत पालिका आयुक्त भुषण गगराणी तसेच पालकमंत्री यांच्याशी याबाबत अनेकदा चर्चा करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाला या प्रश्नाचे गांर्भीय नसल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी कालच्या साई प्रस्थच्या घटनेनंतर सांगितले.
साई प्रस्थ येथे आलेल्या बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. मात्र त्या ठिकाणी रात्री अपरात्री एखादा व्यक्ती असता तर त्याची शिकार झाली असती त्यामुळे या भागात भितीची वातावरण निर्माण झाले असून नागरीकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी प्रशासनाने संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी खा. संजय दिना पाटील यांनी केली आहे.





Be First to Comment