Press "Enter" to skip to content

शिवसेनेने केला आयुक्त मंगेश चितळे व सहकाऱ्यांचा सत्कार

इ-गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमात पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल दि.०४ (संजय कदम)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमात पनवेल महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे यांच्या नेतृत्वात पनवेल शहर शिवसेनेकडून पनवेल महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक मंगेश चितळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई यांसारख्या मोठ्या आणि अनुभवी महानगरपालिकांशी थेट स्पर्धा असतानाही पनवेल महापालिकेने अव्वल स्थान मिळवून राज्यभरात आपली छाप पाडली आहे. ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेचे संकेतस्थळ अधिक सुलभ, सुरक्षित आणि अद्ययावत करणे, नागरिकांसाठी प्रभावी डिजिटल डॅशबोर्ड विकसित करणे, ‘आपले सरकार’ अंतर्गत विहित वेळेत सेवा देणे, कार्यालयीन कामकाजात ई-ऑफिसचा व्यापक वापर, व्हॉट्सॲप चॅटबोट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तसेच जीआरएस प्रणालीचा प्रभावी अवलंब अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला होता.हे उल्लेखनीय यश आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच मिळाले आहे. आयुक्त चितळेंसह परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, संगणक विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे तसेच संबंधित विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत हे यश मिळवले.

विशेष म्हणजे, यापूर्वी १०० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर १५० दिवसांच्या कार्यक्रमात थेट प्रथम क्रमांकावर झेप घेत प्रशासनाचा कायापालट पनवेलने प्रत्यक्षात उतरवला आहे. या स्पर्धेत राज्यातील एकूण 29 महापालिकांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी शिवसेना पनवेल उपमहानगर संघटक राहुल गोगटे, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, अर्जुन परदेशी, प्रभाग १४ विभागप्रमुख ॲड. आशिष पनवेलकर, सिद्धेश पवार, महिला उपशहरप्रमुख सौ. अर्चना जाधव आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.