Press "Enter" to skip to content

सामाजिक उपक्रमांतून वृद्धिंगत केली गेट-टुगेदर ची गोडी

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या बी एस स्सी ९७ बॅच चे चौथे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न

पनवेल / प्रतिनिधी.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून १९९७ साली पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे सलग चौथे गेट-टुगेदर १ फेब्रुवारी रोजी लोणीवली येथे उत्साहात संपन्न झाले.तब्बल २९ वर्षांपूर्वी क्लासमेट असणाऱ्या या तमाम सवंगड्यांनी अजूनही मैत्रीची वीण घट्ट ठेवली असल्याचे या सोहळ्यात दिसून आले. विशेष उल्लेखनीय म्हणजे गेट-टुगेदर मधील धम्माल मस्ती करत असताना या बॅचमधील सवंगड्यांनी सामाजिक उपक्रम राबवत गेट-टुगेदर ची गोडी वृद्धिंगत केली आहे.

लोणीवली येथील निसर्गरम्य वातावरणातल्या सृष्टी फार्म हाऊस वरती १९९७ साली बी एस सी झालेले सवंगडी जमले होते. तत्पूर्वी नजीकच्या विश्वधर्म वारकरी सामाजिक संस्था यांना या बॅचमेट्स ने शौचालय उभारणी करता आर्थिक सहाय्य केले होते. या अर्थसहाय्यातून सदरच्या आश्रमात शिकणाऱ्या ४५ विद्यार्थ्यां करता ४ सीट चे शौचालय बनवण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी या बॅचमधील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच जनसंपर्काच्या माध्यमातून आपल्या सोबत उत्तीर्ण झालेल्या सवंगड्यांचे नंबर मिळवून त्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला. तब्बल २६ वर्षानंतर मैत्रीचा मळा फुलला होता. चार वर्षांपूर्वी, वर्षातून किमान एकदा तरी भेटायचेच हा चंग बांधत हे बॅचमेट्स त्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य देखील करत आहेत.
वारदोली येथील विश्वधर्म वारकरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प रामायणाचार्य संजय महाराज पाटील यांनी ९७ बॅचमेट मधील राजेश हुद्दार यांच्याकडे त्यांच्या आश्रमातील मुलांना शौचालयाची अत्यंत गरज असल्याचे कळविले. येथील लहान लहान मुलांना नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जावे लागत असायचे. राजेश हुद्दार यांनी ही संकल्पना आपल्या सवंगड्यासमोर मांडतच बॅचमेटसनी त्वरित प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला.९७ बॅचमेट मधील सवंगड्यांनी यथाशक्ती आर्थिक हातभार लावत तब्बल ४५ हजार रुपये जमवून विश्वधर्म वारकरी सामाजिक संस्थेला दिले होते त्यामधून चार सीटच्या शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.

९७ बॅचमेट यांनी एका सजग सामाजिक उपक्रमाला हातभार लावल्याबद्दल ह भ प रामायणाचार्य संजय महाराज पाटील यांनी आभार व्यक्त केले तसेच ९७ बॅचमेट यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. योगेश वाणी यांनी येथील मुलांना सकस आहार मिळावा या प्रामाणिक उद्देशाने अन्नदान केले.चौथ्या गेट-टुगेदर च्या सकाळच्या सत्रामध्ये सर्व बॅचमेट कॉलेजमध्ये जमा झाले होते विशेष उल्लेखनीय म्हणजे या बॅचमधील मुलींनी देखील या वेळच्या गेट-टुगेदर मध्ये सहभाग नोंदविला.

संध्याकाळच्या सत्रामध्ये या बॅचमधील सदस्य असणारे प्रशांत पाटील यांच्या सृष्टी फार्म हाऊसवर बॅचमेटसनी धम्माल मस्तीचा सोहळा अनुभवला. रिल्स बनवत,सेल्फी काढत आणि एकमेकांना आलिंगन देत मैत्रीची संध्याकाळ रंगत गेली. काही मित्रांनी निळ्याशार तरणतलावामध्ये पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला. कराओके सिंगिंगवर मित्रांची पावले थिरकू लागली.एक से बढकर एक गाणी सादर करण्याची जणू काही स्पर्धाच लागली होती. कोळी गीतांच्या तालावर सर्व मित्रमंडळी बेभान होऊन नाचले तर पारंपारिक पद्धतीने सादर झालेल्या बाल्या गीताच्या ठेक्यावर सगळ्यांनी बाल्या डान्सचे कसब एकमेकांना दाखवले. वालाच्या शेंगा, झणझणीत मांसाहारी आणि लझीझ शाकाहारी भोजनाचा आस्वाद सर्व मित्रांनी घेतला. उत्तर रात्री पर्यंत गप्पांचे फड रंगले. या गेट-टुगेदर साठी डोंबिवली ठाणे मुंबई येथून काही मित्रमंडळी आवर्जून उपस्थित राहिले होती तर जुन्या बॅचमेट्स ना भेटण्यासाठी अंकुश पाटील हे थेट दुबईहून खास सुट्टी घेऊन सहभागी झाले होते. रामदास होळ हे गुजरात राज्यातून खास गेट टुगेदर साठी उपस्थित राहिले होते.कमिटमेंट देऊन सुद्धा न येणाऱ्या मित्रांच्या नावाने लाखोल्या वाहून झाल्या. पुढच्या वर्षी गेट-टुगेदर ची प्रथा अशीच सुरू ठेवायची आणि सोबत सामाजिक उपक्रम देखील करत राहायचे असा चंग बांधत सर्व मित्रांनी आपापल्या घरची वाट धरली.

गेट-टुगेदर आयोजित करण्यासाठी समीर आंबवणे, किसन खारके, नंदकुमार मुंबईकर, राजेश हुद्दार,उदय शेळके, संतोष चौधरी, भालचंद्र गवंडी यांनी अथक परिश्रम घेतले.आनंद जितेकर यांनी भोजन व्यवस्थेकरता सढळ हस्ते अर्थसहाय्य दिले.प्रशांत पाटील यांनी त्यांचे सृष्टी फार्म हाऊस मित्रांकरता खुले करून दिले, वसंत भोईर उर्फ नाना यांनी इव्हेंट मॅनेजमेंट ची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली तर राजेश हुद्दार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांभाळले. या सोहळ्यामध्ये रमेश तुपे, अमोल गोवारी, विजय खिल्लारे, अनिल मोकल, सचिन देशमुख, गणेश घरत, मंदार करंदीकर, उदय लोटणकर, शिवाजी चव्हाण,योगेश वाणी,उदय शेळके, रामदास होळ, शंकर हुद्दार, अमित जोशी,नंदकुमार म्हात्रे, विनोद पाटील, शिवाजी चव्हाण, महादेव कांबळे, दत्ता म्हात्रे, सचिन देशमुख कृष्णा म्हात्रे, अनिल गोंधळी, आनंद जीतेकर, मंदार दोंदे,रमेश पाटील, नरेश खुटले, गुरुनाथ वालीलकर, सुनील पवार, रमेश तुपे घनश्याम भगत, सुनील खुटले, गिरीश देशमुख, संतोष मोकल, रवींद्र म्हात्रे, जीवन माळी, अभय पाटील, कमलाकर गोजे, योगेश आचार्य, राजा गोठल, तुषार यादव, गुरुदत्त कांबळे, केदार मुंडे, विनोद तारेकर, सुशीलकांत तारेकर, वासुदेव ठाकूर दिलीप आगलावे आदी सवंगड्यांनी गेट-टुगेदरचा मनमुराद आनंद लुटला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.