
महेंद्रशेठ घरत यांची ITF राष्ट्रीय समन्वय समितीच्या सेक्रेटरी पदी नियुक्ती !
उलवे, ता. ३१ : ‘नुसी सीफेरर भवन’चा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी उलवे नोडमध्ये थाटात करण्यात आला. जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर आणि त्यांच्या सहचारिणी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
या सोहळ्याला आयटीएफचे (लंडन) जनरल सेक्रेटरी स्टीफन कॉटन, रिजनल सेक्रेटरी स्कॉट मॅक डाईन, लॅक लिन, राजा श्रीधर, वेणू नायर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी एशिया पॅसिफिकचे जपानवरून शिष्टमंडळ आले होते. नुसी (नॅशनल युनियन ऑफ सीफेरर ऑफ इंडिया) आणि मॅरिटाईम युनियन ऑफ इंडिया संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

उलवे नोडमधील सेक्टर २७ येथे ‘नुसी सिफेरर भवन’ हे १२ मजल्यांचे टॉवर उभारले जात आहे. परदेशात जहाजावर ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी त्यात निवासाची सुविधा असेल. जपानवरून येणाऱ्या सीफेरर साठीही एक मजला असेल. यात आयटीएफचे प्रादेशिक कार्यालयही असेल. त्यामुळे कॉ र्पोरेट क्षेत्राला साजेसे आणि कालानुरूप जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेलअशी ही भव्य वास्तू असेल.
आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या पुढाकाराने उभे राहत असलेले अतिभव्य आणि जागतिक दर्जाचे ‘नुसी सीफेरर भवन’ हे अत्याधुनिक संकुल देशातील पोर्ट व वाहतूक क्षेत्रातील हजारो कामगारांसाठी हक्काचे माहेरघर ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि न्यू मॅरिटाईम अॅण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे आयटीएफचे एक्सिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर झाल्यानंतर भारतात पहिल्यांदाच शुक्रवारी (ता. ३०) मुंबई येथे बैठक झाली. त्या बैठकीत कामगार कायदे आणि आगामी काळात उदभवणाऱ्या अडीअडचणी, आव्हाने यावर साधकबाधक चर्चा झाली. यावेळी आयटीएफचे (लंडन) जनरल सेक्रेटरी स्टीफन कॉटन, रिजनल सेक्रेटरी स्कॉट मॅक डाईन तसेच एक्सिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर आणि नव्याने नियुक्त करण्यात आलेले ITF राष्ट्रीय समन्वय समितीचे सेक्रेटरी महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
महेंद्रशेठ यांच्या प्रयत्नाने पोर्ट क्षेत्रातील कामगारांसाठी आणि पोर्ट क्षेत्राशी निगडित व्यावसायिकांसाठी उभे राहत असलेले नुसी सी-फेरर भवन हे महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला शेकडो कामगार आणि पोर्ट क्षेत्रातील उच्च पदस्थ उपस्थित होते. न्यू मॅरिटाईम अॅड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रामण आणि सरचिटणीस वैभव पाटील यांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.





Be First to Comment