
उरणमध्ये भरदिवसा १८ तोळ्यांची चोरी ; आठवडा बाजार चोरट्यांचा अड्डा ठरतोय
उरण (घन:श्याम कडू)
उरण तालुक्यात भरदिवसा होणाऱ्या चोऱ्यांनी नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचा सूर वाढत चालला आहे. काल दिनांक १५ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास द्रोणागिरी नोड, सेक्टर-५० येथील स्काय सिटीतील ‘अनंत कॉर्नर’ इमारतीच्या ८०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहणारे दीपराज चंद्रकांत ठाकूर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे १८ तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे ₹१४ लाख ४० हजारांचे मालमत्ता लंपास केली.
या घटनेत विशेष म्हणजे घराचे लॅच लॉक तोडून बेडरूममधील कपाट उघडून चोरट्यांनी अत्यंत शिताफीने दागिने चोरी केले. चोरी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र नेहमीप्रमाणे ‘पुढील तपास सुरू आहे’ या औपचारिक वाक्यापलीकडे काहीच घडलेले नाही.
दीपराज ठाकूर हे सीव्ही प्रा. लि. कंपनीत कार्यरत असून, त्यांची पत्नी पूनम ठाकूर या उरण एज्युकेशन सोसायटी शाळेत शिक्षिका आहेत. दोघेही कामावर व मुलगा शाळेत गेल्यानंतर घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ही धाडसी कारवाई केली.
द्रोणागिरी नोडमध्ये गेल्या १५ दिवसांत घडलेली ही तिसरी चोरी असून, उरण शहरातही याच कालावधीत दोन-तीन घटना घडल्या आहेत. तरीही उरण पोलिसांना एकाही घटनेतील चोरट्यांचा ठावठिकाणा लावता आलेला नाही, ही गंभीर बाब आहे.
या चोरीमागे उरण शहरात व तालुक्यात बिनधास्तपणे भरत असलेल्या अनधिकृत आठवडा बाजारांचे कनेक्शन असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. बाजारांमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत रेकी करून नंतर चोऱ्या केल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.
या बाजारांना बंद करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे, परंतु पोलिस आणि प्रशासन दोघेही पूर्णतः ढिम्म आहेत. जनतेचा संयम सुटू लागला आहे आणि आता “बाजार बंद करा, नाहीतर जनता रस्त्यावर येईल!” असा सज्जड इशारा दिला जात आहे.
उरण पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने आता तरी जागे होऊन तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा याचे गंभीर परिणाम त्यांनाच भोगावे लागतील.





Be First to Comment