Press "Enter" to skip to content

खांदेश्वर पोलिस स्टेशनच्या वतीने रेजिंग डे निमित्त मेडिटेशन कार्यक्रम संपन्न

खांदा कॉलनी (पनवेल): येथील खान्देश हॉटेल सभागृहामध्ये शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी खांदेश्वर पोलिस स्टेशनच्या वतीने ”रेजिंग डे” निमित्त विशेष मेडिटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सनातन संस्थेचे साधक श्री. श्रीकृष्ण उपाध्ये यांनी तणाव व्यवस्थापन म्हणजेच ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनादरम्यान श्री. श्रीकृष्ण उपाध्ये यांनी तणाव म्हणजे काय, तणाव निर्माण होण्याची कारणे, त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी चर्चा केली. तणाव दूर करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन, स्वयंसूचना, मनाची स्थिरता, सकारात्मक दृष्टिकोन आणि कठीण प्रसंगी अध्यात्मिक बळ कसे मिळवावे, याबाबत त्यांनी PPT च्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कुलदेवता व दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित करत, मनाला शांतता व स्थैर्य मिळवण्याचे उपाय सांगितले.

प्रत्येक गोष्ट सकारात्मक विचाराने केल्यास ताण कमी होतो. – श्रीमती स्मिता ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खांदेश्वर पोलिस स्टेशन.
कार्यक्रमाच्या शेवटी खांदेश्वर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता ढाकणे यांनी उपस्थित पोलिसांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी चांगलीच घडत आहे या सकारात्मक विचाराने काम केल्यास ताण कमी होतो. चांगली कर्मे केल्याने त्याचे चांगले परिणाम मिळतात, त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सहकार्य करा.” तसेच त्यांनी त्यांच्या सेवाकाळातील चांगले वाईट अनुभव शेअर करत, पोलिसांना कठीण प्रसंगांमध्ये सकारात्मकता टिकवण्याचा सल्ला दिला.

क्षणचित्रे : या कार्यक्रमाला पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलिस उपस्थित होते. यावेळी सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथ व सात्त्विक उत्पादनांचा कक्ष लावण्यात आला होता, ज्याचा लाभ उपस्थितांनी घेतला.

सदर कार्यक्रमामुळे पोलिसांना तणाव व्यवस्थापन व सकारात्मकतेचा आधार मिळाला असून, त्याचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.