Press "Enter" to skip to content

४१हजार दिव्यांची रोषणाई करून स्वर्गीय दादाना जन्मदिनी अनोखा उपक्रम

एक दिवा दादांसाठी या संकल्पनेतून सुधागड विद्यासंकुल झाले प्रकाशमय


(मनोज पाटील -कळंबोली) सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व.दादासाहेब लिमये यांच्या ११५ व्या जयंतीचे औचित्य साधून कळंबोली येथील सुधागड विद्या संकुल येथे ता. ३० नोव्हेंबर ला सायंकाळी ४१हजार दिव्यांची रोषणाई करून स्वर्गीय दादाना जन्मदिनी अनोखा उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले.


सुधागड विद्या संकुल कळंबोलीचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या संकल्पनेतून ह्या दीपोत्सवाची आखणी करण्यात आली होती. “एक दिवा दादासाहेबांसाठी” अशी कल्पना डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली होती. सुधागड विद्या संकुलात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेवून शिक्षणमहर्षी स्व.दादासाहेबांच्या कर्तुत्वाला विद्यार्थ्यांकडून व शिक्षकांडून अनोखी सलामी देण्यात आली.गेल्या वर्षी २८ नोहेंबर रोजी स्व.दादासाहेब लिमये जयंती उत्सव साजरा केला होता .त्या वेळी मागील वर्षी ११ हजार दिव्यांची आरास विद्यालयाच्या प्रांगणात केलेली होती .

या वर्षी प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर ४१ हजार दिव्यांची संकल्पना मांडली.या संकल्पनेला विद्यार्थ्यी व शिक्षक यांनी प्रतिसाद देवून
प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना किमान एक दिवा दादासाहेबांसाठी आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अनोखा प्रतिसाद दाखवत प्रत्येकी १० दिवे आणून हा नाविण्यपूर्ण उपक्रम यशस्वी करून दाखविला.या उपक्रमात विद्या संकुलातील सर्व माध्यमांच्या सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेवून प्रत्येक वर्गाला विद्यालयाच्या मैदानात स्वतंत्र जागा आखून देण्यात आले होती. त्या जागेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांची मांडणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे विद्या संकुलातील मराठी,हिंदी,इंग्रजी ,उर्दु माध्यमातील व उच्च माध्यमिक विभागातील कला ,वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण १६३ तुकड्याचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अतिशय सुरेख पद्धतीने दिव्यांची आरास केलेली दिसून आली.

या साठी प्राचार्य राजेंद्र पालवे , उप मुख्याध्यापक सुरेश शिंदे , उच्च माध्यमिकचे उप प्राचार्य संजय पाटील , पर्यवेक्षक अनिता पाटील,बाबूराव शिंदे,धर्मेद्र दिक्षित,पुनम कांबळे ,इंग्रजी माध्यमाचे विभाग प्रमुख कल्पना कुलकर्णी , मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वनिता कोळी ,हिंदी प्राथमिक विभागप्रमुख दिनेश पाटील , कार्यालयीन प्रमुख बीना कडू व सर्व शिक्षकांनी मेहनत घेवून हा उपक्रम यशस्वी केला.

या उपक्रमाची सुरवात सरस्वती पूजन ,स्व. दादासाहेब लिमये यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यानंतर मुख्य प्रवेश द्वारावर श्री विठ्ठलाच्या भव्य प्रतिकृती चे पूजन प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या हस्ते करून सर्व वर्ग शिक्षकांना एकाच वेळी सर्व दिवे प्रज्वलित करण्याचे सांगण्यात आले.याप्रमाणे एकाच वेळी सर्व दिवे प्रज्वलित झाल्याने सुधागड विद्या संकुल पुर्ण प्रकाशमय झाला.

” तिमिरातून प्रकाशाकडे ” हे दादासाहेबांच्या वचनाचे प्रत्यक्ष कृतीतून सादरीकरण झाल्याने अतिशय भव्य दिव्य दीपोत्सव दादांच्या जयंती निमित्त साकार केल्याने परिसरातील मान्यवरांनी , नागरिकांनी , व पालकांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.