तालुका क्रीडा अधिकारी मनिषा मानकर यांच्या पुढाकाराने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
पनवेल / प्रतिनिधी
उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा या प्रामाणिक भावनेतून तालुका क्रीडा अधिकारी मनीषा मानकर यांनी खो-ख प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे सदरहू उन्हाळी प्रशिक्षण शिबिर हे पूर्णपणे विनामुल्य आहे. मनीषा मानकर यांच्या माध्यमातून इतर वेळेस देखील सायंकाळच्या सत्रांमध्ये शाळकरी मुलांकरता खो-खोचे विनामूल्य प्रशिक्षण शिबिर चालविले जाते.५ मे पर्यंत चालणाऱ्या या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे.
तालुका क्रीडा केंद्राच्या क्रीडांगणावर दोन खो खो ची कोर्ट उभारण्यात आली असून येथे अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने मुलांना खो-खोचे प्रशिक्षण दिले जाते. सीनियर केजी पासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या प्रशिक्षणात सहभागी झाल्याचे समजते. सध्या या ठिकाणी ५० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत यातील पाच खेळाडू जरी जिल्हा पातळीपर्यंत पोहोचले तरी आमच्या प्रयत्नांना यश आल्याचे आम्ही समजू अशी प्रतिक्रिया मनीषा मानकर यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की २० एप्रिल ते पाच मे असे १५ दिवस हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर चालणार आहे. सुट्ट्यांचा सदुपयोग, खेळाशी ओळख आणि फिटनेस अशी तिहेरी उद्दिष्टे या शिबिराच्या माध्यमातून साध्य करण्याचा आमचा मानस आहे.
या शिबिरातील सगळ्यात लहान असणारी स्वरा राहुल धार्मिक या मुलीची आई स्वाती धार्मिक यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की या शिबिराचा स्वराला खूप चांगला फायदा होत आहे तिची एनर्जी लेव्हल वाढते आहे तिला खेळाची गोडी निर्माण झाली आहे. ती या खेळात इतकी रममाण झाली आहे की कधीही खाडा होऊ देत नाही. तसेच अंश पाटील या विद्यार्थ्यांची आई प्रीती पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की या शिबिरामुळे अंश चे कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे तसेच त्याच्या ठाई शिस्त बळावते आहे खो-खो हा त्याचा आवडीचा खेळ बनला असल्या कारणामुळे तो अजिबात प्रशिक्षण चुकवत नाही. तसेच खो-खोचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत असल्याचा फायदा त्याला अथलेटिक्स या खेळ प्रकारात देखील होतो.
मनीषा मानकर यांच्या या अभिनव उपक्रमात त्यांना लावण्य मगर, समीर म्हात्रे, ह्रितिक पवार,शुभम कांबळे, अभिजीत जाधव यांचे सहकार्य लाभते आहे.तर ज्ञानेश्वर महाजन मैदानाची देखभाल घेत असतात.सुट्टी मध्ये मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना खेळाची ओळख मिळावी आणि त्यांची शारीरिक कसरत व्हावी असे जर वाटत असेल तर मनीषा मानकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या खो खो उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्ये आपल्या पाल्यांना आवर्जून सहभागी व्हायला प्रवृत्त करा.
Be First to Comment