वेणगाव येथील जागृत “श्री महालक्ष्मी देवी”
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत रेल्वे स्थानकापासुन पुर्वेकडे चार किलोमीटर अंतरावर कर्जत – जांभिवली रस्त्यावर वेणगाव येथे श्री महालक्ष्मी स्वयंभू देवस्थान आहे, हे महालक्ष्मी देवस्थान अति प्राचीन असुन पंचक्रोशीत तसेच मुंबई – पुण्याहून असंख्य भाविक नवरात्रोत्सवात आवर्जून दर्शनासाठी येतात. हे जागृत देवस्थान आहे.
1857 च्या आंदोलनातील पुढारी नानासाहेब पेशव्यांचा जन्म या वेणगाव गावी झाला, नवरात्रीला श्री महालक्ष्मी मंदीरात उत्सव व यात्रा भरत असल्याचा उल्लेख महाराष्ट्र राज्य गॅझेटियर रायगड जिल्ह्यांतील प्रेक्षणीय स्थळ पान. नं. 864 मध्ये आहे, या देवास्थानची आख्यायिका अशी सांगितली जाते की, कोल्हपुरची श्री महालक्ष्मी आपल्या बहिणीस भेटावयास जाताना तिच्या रथाचे चाक घसरले व थोड्याच अंतरावर रथाच्या एका घोड्याचा पाय घसरला, श्री महालक्ष्मी तेथेच वास करुन राहिली, ते ठिकाण म्हणजेच सद्यस्थितीतील असलेले श्री महालक्ष्मी मंदीर होय, देवीच्या रथाचे चाक व घोड्याचा पाय जेथे घसरला ती ठिक़ाणे मंदीर परिसरात आजही पहावयास मिळतात.
सुमारे दोनशे वर्षापुर्वी वेणगाव येथील एक गावक-याच्या स्वप्नात देवीने येऊन येथे वास करित असल्याचा दृष्टांत दिला व गावक-यांनी तिथे निवारा बांधला व श्री देवीचे दैनंदिन पुजा-अर्चा सांजवात सुरु केली व ती आजतागायत अव्याहतपणे सुरु आहे, काळाच्या ओघात मंदीर जिर्ण झाले होते तसेच भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी या श्रध्दास्थानाचा जीर्णोध्दार 1997 साली विश्वस्त समितीने केला, देवीचे सथान स्वयंभू असुन तिच्या नवसाची प्रचिती अनेक भक्तांना आलेली आहे, यामुळे कर्जत पंचक्रोशी तसेच लांब लांबुन भक्तगण श्री महालक्ष्मीच्या दर्शनास अखंड येत असतात, हे मंदीर अतिशय रम्य अश्या ठिक़ाणी आहे, आजुबाजुला डोंगर, शेती, वनश्री असल्याने या परिसरात आल्यावर खुपच प्रसन्न वाटते.
ट्रस्ट तर्फे त्रिपुरा पोर्णिमा, हनुमान जयंती, होळी पोर्णिमा, सीमोल्लंघन व माघी गणेशोत्सव आदी कार्यक्रम केले जातात, नवरात्रीत नऊ दिवस दर्शनासाठी गर्दी होते, नऊ दिवस येथे पुजा सप्तशक्ती पाठ, पठण, अभिषेक, भजन-किर्तन असे कार्यक्रम आयोजित केले जातात, घट उत्थापनाचे दिवशी नवचंडी चा होम केला जातो.
Be First to Comment