सिटी बेल ∆ पनवेल ∆
शेतकरी कामगार पक्षाचा ७६ वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यातील पाली येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. छत्रपती संभाजी राजे या वर्धापन दिन सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने शेतकरी कामगार पक्षाचे वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की दिवाळी,होळीच्या सणाची जशी आपण वाट पाहतो तसे आम्ही कार्यकर्ते वर्धापन दिनाची वाट पाहत असतो. कारण विचारांचे सोने लुटण्यासाठी आम्ही तिकडे जात असतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वैचारिक प्रगल्भता प्राप्त करण्यासाठी ही एक पर्वणी असते.
यावेळी आपल्या भावना प्रकट करताना प्रभुदास भोईर म्हणाले की मी यापूर्वीचे अनेक वर्धापन दिन केवळ आणि केवळ शेतकरी कामगार पक्षाचे महर्षी, ऋषीतुल्य, ११ वेळा आमदार असणारे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे भाषण ऐकण्याकरता जात असे. या वर्धापन दिन सोहळ्याला ते आपल्यात नाहीत. मी त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि त्यांची अनुपस्थिती मला जळी स्थळी काष्टी पाषाणी जाणवत राहील. आमचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, माझे मार्गदर्शक गुरुवर्य माजी आमदार विवेक पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या संस्कारात तयार झालेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना समाजातील शोषित वंचित आणि कमकुवत लोकांना आधार देण्याचे बाळकडू प्राप्त झाले आहे. माथाडी, कामगार आणि वाहतूकदार यांच्या समस्या सोडविण्याची फार मोठी जबाबदारी पक्षाने माझ्यावरती दिली आहे. मी अत्यंत समाधानकारकरीत्या ती जबाबदारी पार पडत आहे.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी माझ्या तमाम कार्यकर्ते आणि पदाधिकारी बांधवांना एवढेच विनंती करीन की वाजत गाजत येताना, जल्लोषात येताना आपल्यामुळे लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आणि वर्धापन दिन सोहळा समाप्त झाल्यानंतर सुरक्षितपणे आपापल्या घरी पोहोचा.
Be First to Comment