सिटी बेल ∆ प्रतिनिधी ∆
नवीन पनवेल ∆
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ समाजसेविका अपर्णा ताम्हणकर उपस्थित होत्या. त्यानी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शैक्षणिक संस्था, कंपन्यांमध्ये सल्लागार म्हणून प्रदीर्घ कार्य करताना येत असलेल्या अनुभवातून बोलताना त्या म्हणाल्या, “शालेय शिक्षण ही सर्व विषयांची तोंड ओळख आहे. ज्ञानाची असंख्य क्षेत्रे, संधी तुमच्या समोर आहेत ” आपला मुद्दा स्पष्ट करून ताम्हणकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध असलेल्या अनेक क्षेत्रांबाबत माहिती दिली. चॅट जीपीटीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ही प्रबळ शक्ती आहे, यावरही त्यांनी आपले मत नोंदवले.

यावेळी व्यासपीठावर माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण, माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन, प्राथमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नमिता जोशी उपस्थित होत्या.
यावेळी अनेक स्पर्धा परीक्षांमधील गुणवंतांनाही सन्मानित करण्यात आले. मनिषा महाजन यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समिता सोमण यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्वाती बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.








Be First to Comment