Press "Enter" to skip to content

खडीमालाला मूळ भाव मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार

पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने केला एल्गार

सत्तेचा वरदहस्त असणाऱ्या स्वराज स्टोन्स च्या संचालकांचे राजीनामे

        २४ एप्रिल रोजी पनवेल उरण महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन स्वराज स्टोन्स एलएलपी या राजकीय वरदहस्त असणाऱ्या हुकूमशाही कंपनी विरोधात रणशिंग फुंकले होते. या कंपनीच्या संचालकांनी राजीनामा देत कंपनीचे काम बंद करत असल्याचे परिपत्रक काढले आहे. या अनुषंगाने पनवेलच्या काँग्रेस भवन मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. संचालकांनी राजीनामे दिले असले तरी देखील जोपर्यंत खडीला मूळ भाव मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी करण्यात आला.
         स्वराज्य स्टोन एल एल पी या कंपनीने ईस्ट इंडिया कंपनीच्या अविर्भावात, तुमचा खडी माल फक्त आम्हालाच विका असा फतवा काढत स्थानिक स्टोन क्रशर्स सोबत करार केला होता. स्थानिकांना थोडा भाव वाढवून दिला असला तरी देखील मूळ खडी भावाच्या दुप्पट भाव केल्याने घरांच्या किमती लक्षणीय पद्धतीने वाढून सर्वसामान्यांना हक्काची घरे घेणे दुरापास्त झाले असते. हे सारे मुद्दे महाविकास आघाडीने जनतेसमोर आणल्यानंतर स्वराज स्टोन्स या कंपनीवर एक प्रकारचा दबाव होता. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे, मंत्री महोदय दादासाहेब भुसे, आणि गिरीश महाजन यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीने या कंपनीमध्ये सहभाग होता. महाविकास आघाडीने हे सारे चव्हाट्यावर आणल्यानंतर संचालकांनी राजीनामे देत धंदा बंद करत असल्याचे परिपत्रक काढले. संचालकांनी राजीनामे दिल्याचे समाधान आहेच परंतु जोपर्यंत गगनाला भिडवलेले खडीमालाचे भाव पुन्हा पूर्वी इतके होत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील अशी भूमिका माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मांडली.
          माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे ( ठाकरे गट) रायगड जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील, काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष तथा पनवेल उरण महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील,शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू,पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष श्रुती ताई म्हात्रे,काँग्रेस पक्षाच्या पनवेल शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे,माजी नगरसेविका शशिकला सिंग,
प्रवक्ते शशिकांत बांदोडकर, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती च्या अध्यक्षा माया अहिरराव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष डॉक्टर अमित दवे, काँगेस चे पनवेल शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लतीफ शेख,  आदींची पत्रकार परिषदेला मंचावर उपस्थिती होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.