सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
गेल्या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबई शहर, दहशतवादी विरोधी पथक, मुंबई राज्य गुप्ता वार्ता विभाग महाराष्ट्र, ठाणे, तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल, मुंब्रा पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजाविणारे व त्यात उल्लेखनिय काम करणारे निवृत्ती बापुराव कोल्हटकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे नुकतेच पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह (धातुचे बोधचिन्ह) व प्रशस्तीपत्रक 1 मे 2023 महाराष्ट्र दिनानिमित्त प्रदान करण्यात येणार आहे.
सध्या मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक या महत्वाच्या पदावर कार्यरत असणारे निवृत्ती कोल्हटकर यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पोलीस कारकिर्दीमध्ये कर्तव्य बजावित असताना अनेक नावाजलेल्या महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने कंदहार विमान अपहरण प्रकरण, विविध कुप्रसिद्ध गँगचे गुन्हेगार, खंडणीखोर व त्यांच्या सोबत झालेल्या 30 पोलीस चकमकीमध्ये सहभाग, मुंबई पश्चिम रेल्वे भीषण साखळी बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट, कळंबोली येथील बॉम्बचा गुन्हा, अनेक स्वयंचलित देशी, विदेशी बनावटीची अग्नीशस्त्रे व दारु गोळा हस्तगत करणे, खुन, खुनाचे प्रयत्न, अपहरण, दरोडा, कोव्हिड 19 महामारीतील रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार, क्रिकेट सामन्यांचे लाईव्ह बेटींग, जबरी चोर्या, करोडो रुपयांच्या भारतीय चलनातील नोटा हस्तगत, आंतरराष्ट्रीय आयात निर्यात होणार्या माल लुटणारे, चोरणार्या गुन्हेगारांच्या टोळ्या जेरबंद करणे त्याचप्रमाणे स्कुडेरिया व गोल्डन मोटार स्कॅम या लक्झरीयस गाडीच्या विक्रीसंदर्भात 251 ग्राहकांची 28 कोटीची झालेली फसवणूक उघडकीस आणून 9 आरोपींना अटक करून 4 कोटी 15 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला होता. तसेच तळोजा पिसार्वे गाव येथे अंमली पदार्थाची विक्री करण्यास आलेल्या दोघांना सापळा रचून अटक करून त्यांच्याकडून 10 लाखाचे हेरॉईन हस्तगत केले होते. त्याचप्रमाणे 79 लाखाच्या गुटख्याची विक्री करणार्या अग्नीशस्त्रासह आलेल्या 5 गुन्हेगारांना सापळा रचून अटक केली होती.
ज्वेलर्स दुकानावर दरोड्यासाठी आलेल्या 3 लुटारुंना खारघर परिसरातून अटक केली होती. पालघर नवी मुंबई येथील मुर्ती चोरी प्रकरणी गुन्हेगारांना अटक केली होती. रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्यांना अटक केली होती. यासारख्या अनेक गुन्हे उघडकीस करण्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. या सर्व कामगिरींची दखल घेत त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या आतापर्यंतच्या गुणवत्तापूर्ण व अति उत्कृष्ट सेवेचा विचार करून महाराष्ट्र शासनाने पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर केल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
Be First to Comment