अतुल इलेव्हन ने पटकावला मा. सरपंच – उपसरपंच चषक : रामेश्वर आंग्रे आणि योगेंद्र कैकाडी यांनी केले होते आयोजन
सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
करंजाडे येथे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या पुढाकाराने मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.१८ व १९ मार्च रोजी करंजाडे येथील लोकनेते दि बा पाटील क्रीडांगणावर भव्य दिव्य स्पर्धा पार पडल्या. करंजाडे नोड आणि गावातील तब्बल २० संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. अतुल इलेव्हन संघाने अंतिम सामना जिंकला तर एकता फायटर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.अतुल इलेव्हन संघ अंतिम विजेता ठरला. रोख रक्कम ५० हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन त्यांना गौरविण्यात आले. तर उपविजेत्या ठरलेल्या एकता फायटर संघाला रोख रक्कम पंचवीस हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. सुरज पाटील याने मालिकाविराचा खिताब पटकावला, अत्याधुनिक धाटणीची सायकल,ब्रॅण्डेड शूज आणि चषक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. धर्मेंद्र पुजारी उत्कृष्ट फलंदाज ठरला, उत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक सनी कैकाडी याने पटकावले तर प्रवीण जगदाळे याच्या चपळ फिल्डिंग मुळे त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
लाखोच्या रकमांच्या आणि मोटरसायकल, मोटारी दिल्या जाणाऱ्या भव्य दिव्य स्पर्धांच्या तुलनेत देखील रामेश्वर आंग्रे, योगेंद्र कैकाडी यांच्या पुढाकाराने आणि गावदेवी क्रिकेट संघ यांच्या आयोजनाने ही स्पर्धा विशेषत्वाने उठून दिसते. अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने या स्पर्धेत काटेकोर नियोजन पाहायला मिळाले. सहभागी २० संघ आणि प्रदर्शनीय सामन्या करता आमंत्रित केले गेलेले पत्रकार आणि पोलीस यांचे संघ या साऱ्यांना पर्सनलाईज टी-शर्ट प्रदान करण्यात आले होते. प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंना भोजनासाठी चविष्ट बिर्याणी दिली जात होती. उन्हाचा तडाखा बघता प्रत्येक इनिंग नंतर आयोजकांच्या वतीने लिंबू सरबत दिले जात होते. करंजाडे विभागातील संघांकरता ही स्पर्धा मर्यादित असली तरी देखील क्रिकेटमधील पराकोटीच्या अत्युच्च बिंदूचा खेळ या स्पर्धेत पाहायला मिळाला. कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद न होता अत्यंत निकोप पद्धतीने या स्पर्धा संपन्न झाल्या.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पनवेल तालुक्यातील पत्रकार आणि नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 मधील पोलिसांचा संघ यांच्या दरम्यान एक प्रदर्शनीय सामना संपन्न झाला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या सामन्यात पत्रकारांच्या संघाने सरशी साधली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गावदेवी क्रिकेट संघातील योगेश राणे, उमेश भोईर केतन आंग्रे, अक्षय गायकवाड, सागर भोईर,अशोक ओवल, मंगेश बोरकर, रोहित राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. विशेष म्हणजे राष्ट्रसंत आणि थोर पुरुषांच्या नावे मैदानामध्ये विशेष स्टँड उभारण्यात आले होते.अमित काळे, सत्यवान काकडे, सुनील तांडेल, वाघमारे यांनी पंच म्हणून अत्यंत चोख कामगिरी पार पाडली.
साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून युट्युब वर या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण दाखविले गेले. हजारो प्रेक्षकांनी युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून या सामन्याचा आनंद लुटला.
Be First to Comment