सिटी बेल ∆ करंजाडे ∆
करंजाडे येथे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या पुढाकाराने मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. करंजाडे येथील लोकनेते दि बा पाटील क्रीडांगणावर भव्य दिव्य स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पनवेल जर्नालिस्ट क्रिकेट क्लब विरुद्ध पोलीस बांधव असा प्रदर्शनीय सामना रंगला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सामन्यात पत्रकारांच्या संघाने सरशी साधली.
करंजाडे येथील गावदेवी क्रिकेट संघ यांच्या विद्यमाने आणि माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या पुढाकाराने भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.रविवारी सकाळी पनवेलचे पत्रकार विरुद्ध पनवेलचे पोलीस असा मैत्रीपूर्ण सामना रंगला. रोज क्राईम बीटमध्ये बातम्यांच्या अनुषंगाने भेटणारे हे दोन समाजातील महत्त्वाचे घटक रविवारी मात्र येथे सामन्यात निवांत मूडमध्ये एकमेकांची गंमत करत होते. आयोजकांच्या वतीने दोन्ही संघांना विशेष जर्सी प्रदान करण्यात आल्या होत्या.
पोलिसांच्या संघात पोलीस उपनिरीक्षक अभय शिंदे दयानंद महाडेश्वर यांच्या नेतृत्वाखाली पो कॉ अमोल डोईफोडे,माधव शेवाळे आणि सहकाऱ्यांनी सहभाग नोंदविला तर पत्रकारांच्या संघात मंदार दोंदे, रत्नाकर पाटील,मयूर तांबडे, शैलेश चव्हाण,विशाल कांबळे, सनीप कलोते,कुणाल जैतपाल, दत्ता मोकल,गणपत वारागडा, सूरज जाधव,तुषार पवार यांनी सामन्याचा आनंद लुटला.माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या हस्ते दोन्ही संघांना प्रदर्शनीय सामन्याचे स्मरण राहावे या हेतूने आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.
यावेळी आपल्या भावना प्रकट करताना सिटीबेल वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे म्हणाले की, अत्यंत सुंदर आयोजन असलेल्या ठिकाणी आम्हाला सन्मानाने प्रदर्शनीय सामना खेळण्यासाठी बोलावणारे आमचे मित्र रामेश्वर आंग्रे आणि योगेंद्र कैकाडी यांचे मनःपूर्वक आभार. सामना म्हटला की हार जित ही होणारच. पण एरवी कामात व्यस्त असणारे पोलीस बांधव आणि पत्रकार आज मात्र चार विरंगुळ्याचे क्षण अनुभवू शकले याचे संपूर्ण श्रेय आयोजकांना द्यावे लागेल. दोन वर्षांपूर्वी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आयोजित एकता चषकामध्ये अशाच प्रकारे पत्रकार विरुद्ध पोलीस हा सामना झाला होता त्यावेळी पोलिसांनी सरशी साधली होती आज विजयाचे पारडे पत्रकारांच्या पदरात पडले. रामेश्वर आंग्रे एक सह्रदयी व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत पत्रकार बंधू नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहतात भविष्यात देखील रामेश्वर आंग्रे यांना जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांच्यापासून केवळ एक हाक दूर असू.
Be First to Comment