खिडूकपाडा येथे दत्त जयंती निमित्त प्रभुदास भोईर यांच्याकडून दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन : सर्व पक्षीय दिग्गजांची लाभणार उपस्थिती
यंदाचे उत्सवाचे १९ वे वर्ष, यावर्षी आमदार भाई जयंत पाटील यांची असणार विशेष उपस्थिती
सिटी बेल ∆ खिडूकपाडा – कळंबोली ∆
खिडुकपाडा येथील प्रभुदास भोईर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे उत्सवाचे एकोणिसावे वर्ष असून हरी किर्तन, हरिपाठ भजन,होम हवन, महाप्रसाद, श्रींचा अभिषेक अशा धार्मिक सोहळ्यांसह जत्रेचा माहोल आणि त्यावर मनोरंजनाचा खास तडका अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दत्त जयंती उत्सवाची सुरुवात आदल्या दिवसापासून म्हणजेच मंगळवार दिनांक ६ डिसेंबर पासून होत असल्याचे मुख्य आयोजक प्रभुदास भोईर यांनी सांगितले. ह भ प अश्विनीताई म्हात्रे यांच्या हरिकीर्तनाने दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ होत आहे. दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी पहाटे श्रींच्या अभिषेकाने कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. होम हवन आणि श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. सकाळच्या सत्रामध्ये खिडूकपाड्याचे कुमारिका भजन मंडळ आणि खारघर चे हनुमान भजन मंडळ हे भजन सेवा देणार आहेत. तर सायंकाळच्या सत्रामध्ये खिडूकपाडा येथील श्री लक्ष्मीनारायण हरिपाठ मंडळ आणि लक्ष्मीनारायण भजन मंडळ यांच्या सुश्राव्य भजनाचा आस्वाद घेता येईल. प्रभुदास भोईर आयोजित श्री दत्त जयंती उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना जत्रेमध्ये धमाल करायची पर्वणी देखील मिळते. पाळणे, चक्र, जम्पिंग जॅक, टॉय ट्रेन यांच्यासह खेळणी कपडे मिठाई यांच्या दुकानांची रेल चेल असते. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संतोष पवार लिखित दिग्दर्शित यदा कदाचित रिटर्न्स हे नाटक आहे. प्रतिवर्षी श्री दत्त जयंती उत्सवात प्रभुदास भोईर मराठी नाटक भाविकांना दाखविण्यासाठी आणत असतात.
एकोणिसाव्या वर्षीच्या दत्त जयंती उत्सवासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, माजी पालकमंत्री आमदार आदिती ताई तटकरे, आमदार बाळाराम पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आमदार निलेश लंके, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, हिंदुस्तान बँकेचे चेअरमन गुलाबराव जगताप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील, बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, स्टील मार्केट कमिटीचे चेअरमन अशोक कुमार गर्ग आदी मान्यवरांची श्री दत्त जयंती उत्सवामध्ये सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
Be First to Comment