Press "Enter" to skip to content

करंजाडे मध्ये महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन

ग्रामपंचायत करंजाडे साठी अफाट शक्ती प्रदर्शनाद्वारे महाविकास आघाडीच्या रामेश्वर बबन आंग्रे यांचा थेट सरपंच पदासाठी व सदस्य पदासाठी ११ जणांचे नामनिर्देशन अर्ज दाखल

सिटी बेल ∆ करंजाडे – पनवेल ∆

१८ डिसेंबर रोजी पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत करंजाडे येथे महाविकास आघाडीचे प्राबल्य दिसून येत असून थेट सरपंच पदासाठी रामेश्वर बबन आंग्रे यांनी सलग दुसऱ्यांदा सरपंच पदी विराजमान होण्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी करंजाडे येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ते थेट पनवेल पंचायत समिती पर्यंत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भव्य रॅलीच्या आणि घोषणांच्या माध्यमातून आपले अफाट शक्तिप्रदर्शन दाखवून दिले. शेतकरी कामगार पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.

पनवेल पंचायत समिती येथील सभागृहामध्ये दहा ग्रामपंचायतींकरता अर्ज दाखल करण्याच्या कामी निवडणूक निर्णय आयोगाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी भूपेंद्र चव्हाण यांच्याकडे ग्रामपंचायत करंजाडे मधील महाविकास आघाडीच्या अकरा सदस्य आणि रामेश्वर बबन आंग्रे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. यावेळी त्यांच्या समवेत पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर चिटणीस गणेश कडू, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य राजू गणा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी तमाम सदस्यांनी आणि रामेश्वर आंग्रे यांनी करंजाडे येथील जागृत समजले जाणारे गावदेवी मंदिर येथे श्रीफळ फोडून निवडणूक अभियानास सुरुवात केली. यावेळी उपस्थित जनसमुदायास संबोधित करताना रामेश्वर आंग्रे म्हणाले की, आपण सगळे प्रगतीवादी विचारांचे पाईक आहोत. गेल्या पाच वर्षात आपण केलेलं काम मतदारांच्या पर्यंत पोहोचविल्यास आपला विजय सुनिश्चित आहे. कारण आपलं काम बोलतंय! विरोधकांनी कितीही अपप्रचार केला, कितीही नियमबाह्य हातखंडे आजमावले तरीदेखील आपण केलेली प्रामाणिक विकास कामे लपणार नाहीत. त्यांच्याकडे धनशक्ती असली,तरी आपल्याकडे अफाट जनशक्ती आहे.

करंजाडे ग्रामपंचायत मध्ये चार प्रभाग असून, प्रभाग क्रमांक एक मध्ये दोन तर प्रभाग क्रमांक दोन तीन व चार मध्ये प्रत्येकी तीन सदस्य निवडणूक लढविणार आहेत. आज दाखल करण्यात आलेल्या अर्जांमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून योगेंद्र दत्तात्रय कैकाडी आणि अंजना शिवाजी कातकरी यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक दोन मधून अक्षय मोहन गायकवाड, उमेश शंकर भोईर, कोमल रवी खिल्लारे यांनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक तीन मध्ये रुपेश बबन आंग्रे नीला योगेश राणे श्रुती निलेश गायकवाड हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. तर प्रभाग क्रमांक चार मधून ध्रुव रामचंद्र बोरकर, कल्पना विनेश गायकर, नीलम मोहन भगत यांनी महाविकास आघाडीच्या वतीने नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना प्रीतम म्हात्रे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून समविचारी पक्षांनी एकत्र येत विकासाची गंगाजळी आणण्याचा जनमानसातून उत्स्फूर्तपणे स्वीकार केला जात आहे. महाविकास आघाडीचे सदस्य आणि थेट सरपंच विजयाचा ध्वज फडकवल्याशिवाय शांत बसणार नाहीत याबाबत माझ्या मनात जरादेखील दुमत नाही. रामेश्वर आंग्रे यांचं काम बोलतंय करंजाडे ग्रामपंचायत सरपंच पदी ते पुन्हा एकदा निवडून येणार असा मला ठाम विश्वास वाटतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.