मानधन तत्वावर काम करणाऱ्या सेविकांचे कार्य कौतुकास्पद — आमदार आदिती तटकरे
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच आशा सेविका या मानधन तत्वावर काम करत असतानाही त्यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता समाजाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची जबाबदारी म्हणून केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री तथा आमदार आदिती तटकरे यांनी पेण केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पेण तालुका व शहर यांच्या वतीने शहरातील गोपाल कृष्ण हॉल येथे नारी शक्तीचा सन्मान या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, ओबीसी सेलचे अध्यक्ष यशवंतदादा घासे, नगरसेविका वसुधा पाटील, महिला अध्यक्षा चैत्राली पाटील, लिना बाफना, सुचिता चव्हाण, मुस्कान झटाम, खारपाडा सरपंच रश्मी भगत आदींसह तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी पुढे बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की जन्मजात बालकांना कोणत्या वेळेला लस, पूरक आहार, वजन नोंदवही यासह इतर गोष्टी आई-वडिलांपेक्षा या सेविकांना अधिक माहिती असते अल्प मानधन असतानाही त्यांचे कार्य हे फार मोलाचे असून अशा नारीचा सन्मान होणे गरजेचे आहे.आपल्या मानधनासाठी आपण विधानसभेत आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी तालुक्यातील जवळपास सहाशे सेविकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार आदिती तटकरे यांनी प्रसिद्ध उद्योजक यशवंतदादा घासे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली.








Be First to Comment