सिटी बेल ∆ पनवेल ∆
मुंबई येथील माँ सरोजा आचारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पनवेल नजीकच्या नेरे परिसरातील तीन सेवाभावी संस्थांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष अली हसन खान, सचिव देवी प्रसाद सिंग, आणि खजिनदार अशोक सिंग यांच्या शुभहस्ते अन्नधान्य जिन्नसाचे वाटप संपन्न झाले. यावेळी सिटी बेल वृत्तसमूहाचे समूह संपादक मंदार दोंदे आणि लोकमतचे प्रतिनिधी मयूर तांबडे यांची विशेष उपस्थिती होते.
नेरे विभागातील संचालिका संगीता नितीन जोशी यांचे स्नेहकुंज आधारगृह, प्रमोद पाटील संचालित वारलेश्वर आधार घर व वृद्धाश्रम आणि ललिता व मनोज कुरुळकर संचालित आदिवासी,कर्ण बधिर, मतिमंद निवासी विद्यालय या संस्थांना माँ सरोजा आचारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी 30 किलो तांदूळ, पंधरा किलो तूर डाळ, पाच किलो मूग डाळ, पाच किलो चवळी, पाच किलो वाटाणा, दहा किलो साखर आणि तेलाचा डब्बा असे रेशन वाटप करण्यात आले.
तिन्ही संस्थांच्या संस्थाचालकांनी माँ सरोजा आचारी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी आणि सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. काही वर्गमित्रांनी एकत्र येत समाजाचे आपण ऋण फेडले पाहिजे या उदात्त भावनेने निर्माण केलेली सेवाभावी संस्था म्हणजेच माँ सरोजा आचारी चॅरिटेबल ट्रस्ट. या संस्थेने यापूर्वी वाडा, जव्हार,विक्रमगड येथील आदिवासी बांधवांच्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. गोराई येथील गोरगरीब वस्त्यांवरती देखील या संस्थेने सेवाभावी वृत्तीने वाटप केले आहे.
सोशल मिडिया की जय हो !
माँ सरोजा आचारी चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार अशोक सिंग आणि सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे हे जवळपास वीस वर्षांपूर्वी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये एकत्र काम करत असत. या कंपनीमधील माजी सहकाऱ्यांनी एकत्र येत एक व्हाट्सअप ग्रुप बनवून त्यायोगे ते एकमेकांच्या संपर्कात असतात. पत्रकार मंदार दोंदे हे तूर्तास पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. साधारण महिन्याभरापूर्वी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने या परिसरातील वृद्धाश्रमांमध्ये चादरींचे आणि भांड्यांचे वाटप केले होते. मंदार दोंदे यांची याबद्दलची फेसबुक पोस्ट पाहून अशोक सिंग यांनी देखील त्यांच्या संस्थेच्या वतीने या निराधारांसाठी आम्ही काहीतरी करू इच्छितो अशी इच्छा प्रकट केली. मंदार दोंदे यांनी लोकमतचे अत्यंत मेहनती पत्रकार मयूर तांबडे यांना याबाबत विचारले असता मयूर तांबडे यांनी आपण अशा संस्थांना मदत केली पाहिजे ज्यांना फारसं कोणी सहकार्य देत नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर मयूर तांबडे यांनी जवळपास दोन आठवडे अथक परिश्रम करून संस्थांना नेमकी कसली गरज आहे? याचा सखोल अभ्यास केला.त्यायोगे रविवारी उपरोक्त तीन संस्थांच्यामध्ये वाटप संपन्न झाले. मयूर तांबडे आणि मंदार दोंदे यांनी समन्वय साधून दिल्यामुळेच आम्ही सदरचा समाजसेवी उपक्रम पार पाडू शकलो अशी भावना संस्थेचे खजिनदार अशोक सिंग यांनी बोलून दाखवली.
Be First to Comment