व्यापारांचे हक्काचे पार्किंग सिडको ने घातले खाजगी पार्किंग चालकाच्या घशात
सिटी बेल ∆ बेलापूर ∆ वार्ताहर ∆
बेलापूर रेल्वे स्थानकातील वाणिज्य संकुलात व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातील पार्किंगचा प्रश्न अनेक महिने प्रलंबित होता. सिडकोच्या वतीने हे पार्किंग चालविण्यासाठी एका खाजगी ठेकेदाराला कंत्राट देण्यात आले त्यानंतर ही समस्या अधिक जटील होऊन गेली आहे. वाणिज्य संकुलातील व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत प्रसार माध्यमांना अवगत करण्यासाठी सोमवार दिनांक 26 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
वाणिज्य संकुलातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत बेलापूर रेल्वे स्टेशन कमर्शियल कॉम्प्लेक्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीबरोबर सिडको ने केलेल्या करारानुसार अनेक सुविधा आजही कंपनीस मिळणे बाकी आहे. येथील व्यापारी व त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या कर्मचारीवृंदाकरिता पार्किंगची जागा राखीव ठेवण्याचे सदर करारामध्ये नमूद आहे. असे कंपनीचे चेअरमन बलविंदर सिंग खेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सिडको काही रक्कम शुल्क म्हणून घेत असे व आम्हाला पार्किंगचे पासेस देत होती तोपर्यंत या समस्येने डोके वरती काढले नव्हते. वास्तविक आमच्याकरता राखीव भूखंडामध्ये आम्हाला विनाशुल्क पार्किंग मिळायला हवे होते. गेले काही महिन्यांपूर्वी सिडको ने आमच्यासाठी राखीव असलेली पार्किंगची जागा एका खाजगी कंत्राटदाराला चालविण्यासाठी दिली. या कंत्राटदाराने व्यापारी संकुलातील लोकांच्या गाड्यांना पार्किंग करण्यास मज्जाव सुरू केला. अत्यंत मग्रूर पद्धतीने बोलणाऱ्या या कंत्राटदाराच्या लोकांनी आमचे कुठलेही म्हणणे ऐकून न घेता आमच्या गाड्यांना नुकसान पोहोचविण्यास सुरुवात केली.
उत्तर रात्री येथे मद्यपी, गर्दुल्ले यांचा वावर वाढला. गाड्या फोडून त्यांच्या आतील ऐवज चोरण्याच्या घटना वाढीस लागल्या. कंत्राट दाराचे कर्मचारी हेतूपुरस्सर पणे वाणिज्य संकुलातील व्यापाऱ्यांच्या गाड्या पंक्चर करू लागले. आमच्या संयमाचा अंत झालेला आहे. आम्हाला कबूल केल्याप्रमाणे पार्किंगचा भूखंड सिडकोने द्यावा म्हणून आज पर्यंत शेकडो वेळा पत्रव्यवहार करून देखील सिडको प्रशासन आमच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहे. वर आमच्या माथी खाजगी कंत्राटदार मारून सिडकोने या वाणिज्य संकुलाचा आणि येथील व्यापारांचा अक्षम्य अपमान केलेला आहे.
यावेळी बलविंदर सिंग यांच्या समवेत कंपनीचे संचालक नारायण भार्गव, सर्वेश्वर शर्मा, कृष्णा पुजारी,वाणिज्य सदनिका धारक पद्मकेश शुक्ला,प्रकाश कुळकर्णी,प्रॉपर्टी मॅनेजर वैभव महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
सिडको ने आमची मागणी मान्य न केल्यास आणि खाजगी पार्किंग कंत्राटदाराची मुजोरी अशीच सुरू राहिल्यास आम्हाला संविधानिक पद्धतीने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे बलविंदर सिंग म्हणाले.
Be First to Comment