Press "Enter" to skip to content

उपायुक्त शिवराज पाटील यांचे मार्गदर्शन

नवरात्रोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी पनवेल तालुका पोलीस स्थानकाचे वतीने मार्गदर्शनपर बैठक संपन्न

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

येणारा नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 अंतर्गत पनवेल तालुका पोलीस स्थानका नजीक असणाऱ्या मंथन हॉल येथे अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. बुधवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडलेल्या या बैठकीला पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस सहआयुक्त भागवत सोनावणे आणि पनवेल तालुका पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर उपस्थित होते.

आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील.

पनवेल तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शांतता कमिटीचे प्रतिनिधी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शिवराज पाटील यांनी महत्त्वपूर्ण अशा सूचना केल्या.
ते म्हणाले की, मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश व महानगरपालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत तसे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावे. तसेच सार्वजनिक दुर्गा मुर्तीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी कोणताही आक्षेपार्ह देखावा नसावा
ते पुढे म्हणाले की नवरात्रौत्सव ठिकाणी जातीय/धार्मिक भावना भडकून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आक्षेपार्ह बॅनर,पोस्टर्स, देखावा किंवा फलक नसावा. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे रेकाॅर्डस्/गाणी वाजविण्यात येवू नयेत. नवरात्रौत्सव मंडळ परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नियंत्रण ठेवण्यासाठी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे लावण्यात यावेत. महीला व पुरूष यांना दर्शनासाठी वेगवेगळया रांगेत दर्शनाची सोय करावी.

नवरात्रौत्सव साजरा करीत असलेल्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगात आणण्यासाठी जनरेटर, फायर फायटर, इत्यादी अत्यावश्यक साधनसामुग्री ठेवण्यात यावी.

मार्गदर्शन करताना पाटील पुढे म्हणाले की, नवरात्रौत्सवानिमित्त सार्वजनिक रस्त्यावर/चौकामध्ये/स्थानिक स्वराज्य संस्थांचे जागेवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे व विद्रूप करणारे फ्लेक्स/बोर्डस्/बॅनर्स इत्यादी उभारण्यात येवू नये. विसर्जनावेळी नदी पत्रात ज्यांना पोहोता येत नाही अशांना नदी पात्रात उतरू देऊ नका त्यांच्याऐवजी स्वयंसेवक यांच्या मार्फत देवी मूर्तीचे विसर्जन करून घेणे.
यावेळी नवरात्रौत्सव सणाचे अनुषंगाने इतर महत्वाच्या सुचना देवून मार्गदर्शन करण्यात आले.

पनवेल तालुका पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पुढाकाराने आणि पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील पोलीस सह आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठकीच्या आयोजनाबद्दल सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.