Press "Enter" to skip to content

वाचा “शिक्षकांच्या पायी दिंडी” वरील गुरूनाथ साठेलकर यांचा लेख

आजही लोकशाहीची मूल्य जपली जातात याचे खोपोलीत प्रत्यंतर ; पायी दिंडीत चालणारे महाराष्ट्राच्या विधिमंडळातील आमदार आणि वास्तव

हल्ली महाराष्ट्रातलं राजकारण नव्हे तर राष्ट्रातलं राजकारण निकृष्ट स्तराला गेल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काल त्या घटनांमध्ये अजून एक भर पडली. संविधानाची शपथ घेतलेले, त्यानंतर देऊळ, मशीद आणि चर्चमध्ये जाऊन ईश्वरा समक्ष शपथ घेतलेले गोव्यातील काही विरोधी आमदार सत्ताधारी पक्षात दाखल झाले. पक्षांतर बंदी कायदा, आपण ज्या पक्षातून निवडून आलो त्या पक्षाची बांधिलकी, आपल्याला निवडून दिलेल्या किंवा आपल्या विरोधात मतदान केलेल्या मतदारांना काय वाटेल याची साधी जाण न ठेवता मनमर्जी सुरू आहे. राजकिय आयुष्यात वेगवेगळी संविधानिक पद भूषवून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या मूळ पक्षाशी फारकत घेणारे, ज्या पक्षाने आपल्याला ओळख दिली त्यावर चिखल फेक करणारे नेते हल्ली मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. इडी, सीआयडी किंवा इतर तपास यंत्रणांची भीती ज्यांच्या मागे असते किंवा त्यांचा बागुलबुवा दाखवला जातो तेच असा नेतृत्व बदल स्वीकारण्यात अग्रेसर असतात असेच दिसून येत आहे.

मला अभिमान वाटतो त्या शेतकरी कामगार पक्षाच्या दिवंगत गणपतराव देशमुख यांचा. अकरा टर्म महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी इतिहास निर्माण केला. शेतकरी कामगार पक्षाच्या लोकप्रतिनिधींना नेहमीच विरोधी बाकावर बसण्याचे योग आले मात्र पक्षादेश आणि पक्षनिष्ठा त्यांना कधीच सत्ताधारी होण्याकडे आकृष्ट करु शकली नाही. एक वेळ गणपतराव देशमुख यांना देखील मंत्री होण्याचा सन्मान मिळाला होता. मात्र अटीतटीच्या क्षणी त्यांना पक्षाने राजीनामा द्यायला सांगितले तेंव्हा त्यांनी तातडीने तो दिला होता. त्याचवेळी श्रीमती मीनाक्षीताई पाटील आणि मोहन पाटील यांनी देखील मंत्री पदाचा त्याग करताना मत्र्यांसाठी असलेले बंगले सोडून घर गाठले होते. लोकसभेत सत्ताधाऱ्यांना बहुमतासाठी फक्त एका मताची गरज होती आणि ते मत त्यावेळच्या शेतकरी कामगार पक्षाच्या खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडे होते. केंद्रातील त्यावेळच्या सरकारने खासदार रामशेठ ठाकूर यांना विविध प्रलोभने दाखवली होती, मात्र पक्ष नेतृत्वाचा आदेश स्वीकारून त्यांनी विरोधात मतदान केल्याने लोकसभा बरखास्त झाली होती. यातून निघणारा अन्वयार्थ पक्षाचे ध्येय आणि धोरण स्वार्थांपेक्षाही मोठे असते हा हेतू अधोरेखित करतो.

हल्ली राजकारणातली नीतिमूल्य संपत चालल्याची उदाहरणे डोळ्यासमोर येत असताना काल एक सकारात्मक चित्र खोपोलीत दिसले. महाराष्ट्रातल्या शिक्षक मतदार संघाचे कोकण विभागाचे आमदार बाळाराम पाटील, नाशिक विभागाचे आमदार किशोर दराडे, पुणे विभागाचे आमदार दत्तात्रय सावंत आणि अमरावती विभागाचे आमदार श्रीकांत देशपांडे हे त्यांना निवडून दिलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आंदोलन करताना पुण्याच्या भिडे वाड्यापासून मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पायी चालत जाण्याचा संकल्प सिद्धीस नेतना दिसले.

बाळाराम पाटील, किशोर दराडे, दत्तात्रय सावंत आणि श्रीकांत देशपांडे हे चारही आमदार खरंतर त्या पायी दिंडीच्या उद्घाटनाला पुण्यातल्या भिडे वाड्यात आणि समारोपाला मुंबईला मंत्रालयात दाखल होऊ शकले असते मात्र त्यांच्यातली नैतिकता, नितीमूल्य, मतदारांप्रती असलेला सदभाव आणि मतदारानी दाखवलेला विश्वास दृढ करण्यासाठी ते आंदोलनकर्त्यासमवेत पायी दिंडीत सामील झाले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भर पावसात चालल्याने आमदारांच्या पायाला जखमा झाल्या आहेत, भिजल्याने शरीरात कणकण वाटते आहे, त्यातील एका आमदाराची हार्ट सर्जरी झालेली आहे, तरी देखील पायी दिंडीत चालण्याचा संकल्प कुठे बाधित होत नाही याला काय म्हणायचे.

पायी दिंडीचे चित्र पाहिल्यानंतर आजही राजकारणात नीतिमत्ता शिल्लक असल्याचे उदाहरण प्रत्यक्ष अनुभवता येते आहे आणि लोकशाहीचा अभिमानही वाटतोय.

शिक्षक आणि शिक्षिकेतर कामगारांच्या प्रश्नासाठी पायी दिंडीत चालणाऱ्या आमदारांचे प्रयत्न म्हणजे अंधारात आणि सोसाट्याच्या वादळात तेवणाऱ्या निरांजना सारखा वाटतोय.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे सरकार उलथवून टाकण्यासाठी मुंबई – सुरत – गोहाटी – गोवा मार्गे आमदारांचा रंजीत प्रवास आणि त्यातील क्षणाक्षणाची दृश्य जगासमोर आणणाऱ्या राष्ट्रीय मीडियाला त्याच महाराष्ट्राच्या विधीमंडळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी पायी दिंडीत चालणाऱ्या आमदारांच्या पायाचे फोड दिसतील का ? असा प्रश्न विचारावासा वाटतो.

लेखक : गुरुनाथ रामचंद्र साठेलकर.
खोपोली – रायगड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.